इजिप्तमध्ये कोसळलेल्या रशियन एअरलाईन्सच्या विमानातील १०० प्रवाशांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती इजिप्तच्या हवाई मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. २२४ प्रवाशांना घेऊन निघालेले रशियाचे एअरबस ए-३२१ हे विमान शनिवारी इजिप्तमधील मध्य सिनई येथे कोसळले होते. त्यानंतर इजिप्तमधील सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना त्याठिकाणी विमानातील बहुतांश प्रवासी मृत्यूमुखी पडल्याचे दिसून आले. मात्र, बचाव पथकांना विमानाच्या काही भागांमधून प्रवाशांचे आवाज येत असल्यामुळे काहीजण वाचल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. याठिकाणी खूप वाईट परिस्थिती आहे. अनेक मृतदेह जमिनीवर पडले आहेत, तर काहीजणांचे मृतदेह सीटला बांधलेल्या अवस्थेतच आढळून आल्याची माहिती घटनास्थळावरील अधिकाऱ्यांनी दिली. जमिनीवर कोसळल्यानंतर या विमानाचे दोन तुकडे झाले असून विमानाचा शेपटाकडचा काही भाग जळाला आहे. तर विमानाचा उर्वरित भाग खडकावर आदळलेला आहे. आतापर्यंत बचावपथकांना १०० मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.
रशियाच्या कोगालमविया हवाई कंपनीच्या या विमानाने स्थानिक वेळेनुसार ५ वाजून ५१ मिनिटांनी इजिप्तच्या शर्म-अल-शेख येथून उड्डाण केले होते. मात्र, उड्डाणानंतर २३ मिनिटांनी विमानाचा इजिप्तच्या वाहतूक नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला होता. त्यामुळे सुरूवातीला विमान बेपत्ता झाल्याची चर्चा होती. त्यानंतर काही वेळातच इजिप्शियन यंत्रणांनी हे विमान कोसळल्याचे स्पष्ट केले. शर्म-अल-शेख येथील रेड सी रिसॉर्ट येथील विमानतळावरून हे विमान रशियाच्या दिशेने निघाले होते. या विमानातील बहुतांश प्रवासी रशियन नागरिक होते.