रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्याला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. पुतिन यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा विकत घेण्यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. पुतिन यांचे परराष्ट्र धोरण विषयक सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी ही माहिती दिली. भारता बरोबर एस-४०० करार करण्यासंबंधी पहिल्यांदा रशियन सरकारकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

५ ऑक्टोंबरला मोदी आणि पुतिन द्विपक्षीय चर्चा करतील. त्यावेळी करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. भारत आणि रशियामध्ये होणाऱ्या या करारात अमेरिकेकडून अडथळा आणला जाण्याची दाट शक्यता आहे. रशिया बरोबर शस्त्रास्त्र करार केला तर निर्बंध घालण्याचे संकेत अमेरिकेने दिले आहेत. भारत आणि रशियामध्ये एस-४०० ट्रायम्फ मिसाइल सिस्टिम खरेदीचा करार महत्वाच्या टप्प्यावर पोहोचलेला असताना आता अमेरिकेकडून या करारामध्ये अडथळा आणला जाण्याची दाट शक्यता आहे.

अमेरिकेच्या सीएएटीएसए कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या देशांवर, संस्था आणि व्यक्तींवर निर्बंध घालण्याच्या आदेशावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेने चीनवर निर्बंध घातले आहेत. कारण चीनने रशियाकडून एसयू-३५ फायटर जेट आणि जमिनीवरुन हवेत मारा करणारी एस-४०० मिसाइल सिस्टिम विकत घेतली आहे. अमेरिकेने सीएएटीएसए कायद्यातंर्गत इराण, रशिया आणि उत्तर कोरिया या देशांवर निर्बंध घातले आहेत.

एस-४०० ही जगातील अत्याधुनिक मिसाइल सिस्टिम असून शत्रूची मिसाइल, फायटर विमाने अचूकतेने टिपण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे. भारत गेल्या कित्येक वर्षांपासून रशियाकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकत घेत आहे. अलीकडेच झालेल्या टू प्लस टू बैठकीत एस-४०० च्या खरेदी व्यवहाराला परवानगी मिळावी यासाठी भारताकडून प्रयत्न करण्यात आले. पण अमेरिकेने अद्याप कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही. एस-४०० मिसाइल सिस्टिमचा भारताच्या शस्त्रास्त्र ताफ्यात समावेश झाला तर चीन, पाकिस्तानचे हवाई हल्ले विफल करता येतील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: S 400 missile deal to be signed during vladimir putins india visit
First published on: 03-10-2018 at 08:32 IST