S Jaishankar on onald Trump Praises Narendra Modi : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लागू केल्यानंतर उभय देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारत व अमेरिकेतील नात्यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत व अमेरिकेच्या भागीदारीला नेहमीच महत्त्व देत आले आहेत. या मैत्रीकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं आहे.” डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच भारत व अमेरिकेच्या संबंधांबंद्दल सकारात्मक वक्तव्य केल्यानंतर जयशंकर यांची देखील तशाच प्रकारची प्रतिक्रिया समोर आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे खास मित्र असल्याचं वक्तव्य केलं आहे. भारत-अमेरिका संबंधांबद्दल प्रश्न विचारल्यावर ट्रम्प म्हणाले, ते नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मित्र राहतील. याचबरोबर भारत-अमेरिकेतील संबंध खास असल्याचीही त्यांनी टिप्पणी केली. दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये काळजी करण्यासारखं काहीही नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं. परंतु, ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सध्याच्या काही धोरणांशी असहमती व्यक्त केली.

मोदी अमेरिकेबरोबरच्या भागीदारीबद्दल गंभीर : एस. जयशंकर

अमेरिकेच्या अध्यक्षांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य आणि मोदींच्या धोरणांवर घेतलेल्या आक्षेपांवर आता जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वैयक्तिक संबंध नेहमीच खास राहीले आहेत. मोदी या संबंधांबद्दल गंभीर आहेत. अमेरिकेबरोबर मजबूद भागीदारी बनवणं ही मोदींची प्राथमिकता आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांबरोबर त्यांचं वैयक्तिक समीकरण नेहमीच उत्तम असल्याचं पाहायला मिळालं आहे.

ट्रम्प यांच्या मोदींच्या धोरणांवरील आक्षेपांबद्दल जयशंकर काय म्हणाले?

जयशंकर म्हणाले, “परराष्ट्र धोरणाबद्दल बोलायचं झाल्यास आपण सातत्याने अमेरिकेच्या संपर्कात आहोत. यावर आत्ता मी अधिक काही बोलू शकत नाही. परंतु, मी इतकं सांगेन की दोन्ही देशांमधील संवाद चालू आहे. दोन्ही देश विविध पातळ्यांवर परस्पर सहकार्य करत आहेत.”

ट्रम्प मोदींबद्दल काय म्हणाले होते?

एएनआयशी बोलताना ट्रम्प म्हणाले होते की “मी नेहमीच पंतप्रधान मोदींचा मित्र राहीन. ते एक महान पंतप्रधान आहेत. पण सध्या मला त्यांची काही धोरणे पटत नाहीत. भारत आणि अमेरिकेचे संबंध खूप खास असले तरी काळजी करण्यासारखं काहीच नाही. कधीकधी असे क्षण येतात.”