पीटीआय, नवी दिल्ली

पुढील आठवड्यात मलेशियामध्ये होणाऱ्या आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वालालंपूरला जाणार नाहीत. त्याऐवजी ते १० देशांच्या गटासह भारताच्या वार्षिक शिखर परिषदेला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती दर्शविणार आहेत. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधल्यानंतर आसियान-भारत शिखर परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होण्यास आणि दोन्ही बाजूंमधील व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

अधिकृत निवेदनानुसार, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर २७ ऑक्टोबर रोजी क्वालालंपूर येथे होणाऱ्या २०व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधानांच्या वतीने भारताचे प्रतिनिधित्व करतील. आसियान असोसिएशन ऑफ साऊथ-ईस्ट एशियन नेशन्स (आसियान) हा या प्रदेशातील सर्वात प्रभावशाली गटांपैकी एक मानला जातो आणि त्यात भारत आणि अमेरिका, चीन, जपान आणि ऑस्ट्रेलियासह इतर अनेक देश संवाद भागीदार आहेत. आसियान सदस्य देशांव्यतिरिक्त, पूर्व आशिया शिखर परिषदेत भारत, चीन, जपान, कोरिया प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका आणि रशिया यांचा समावेश आहे.

दरम्यान, मलेशियाच्या पंतप्रधानांनी बुधवारी रात्री पंतप्रधान मोदींशी चर्चा केली आणि द्विपक्षीय संबंध अधिक धोरणात्मक आणि व्यापक पातळीवर मजबूत करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा केल्याचे समाज माध्यमावर सांगितले. आसियान शिखर परिषद आणि संबंधित बैठका २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान क्वालालंपूर येथे होणार आहेत. गेल्या काही वर्षांत पंतप्रधान मोदींनी आसियान-भारत शिखर परिषद आणि पूर्व आशिया शिखर परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे पंतप्रधानांनी परिषदेला जाणे स्थगित केले आहे. सध्या दिवाळी असल्याचे कारण मलेशियाचे पंतप्रधान इब्राहिम यांनी सांगितले. भारत व्यापार आणि गुंतवणूक तसेच तंत्रज्ञान, शिक्षण आणि प्रादेशिक सुरक्षेच्या क्षेत्रात जवळचे सहकार्य या क्षेत्रात मलेशियासाठी एक महत्त्वाचा भागीदार असल्याचे सांगतानाच त्यांनी शिखर परिषदेच्या आयोजनाबाबत पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केल्याचेदेखील त्यांनी सांगितले. तसेच मलेशिया भारताबरोबर संबंध मजबूत करण्यासाठी आणि अधिक शांततापूर्ण आणि समृद्ध प्रदेशासाठी आसियान-भारत सहकार्य वाढवण्यासाठी वचनबद्ध असल्याचेदेखील ते म्हणाले.

ट्रम्पही सहभागी

आसियान शिखर परिषद २६ ते २८ ऑक्टोबर रोजी होणार असून मलेशियाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसेच आसियान गटाचे संवाद भागीदार असलेल्या अनेक देशांच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे. ट्रम्प २६ ऑक्टोबर रोजी दोन दिवसांच्या क्वालालंपूर दौऱ्यावर जाणार आहेत. इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार आणि कंबोडिया हे आसियानचे १० सदस्य देश आहेत.

काँग्रेसची टीका

पंतप्रधानांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सामना करायचा नसल्यानेच पंतप्रधानांनी परिषदेला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याचा दावा काँग्रेसने केला. मोदी यांच्या न जाण्याच्या निर्णयाचे कारण स्पष्ट आहे. त्यांना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याभोवती राहायचे नाही. काही आठवड्यांपूर्वी त्यांनी याच कारणासाठी इजिप्तमध्ये गाझा शांतता शिखर परिषदेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण नाकारले होते, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले. दरम्यान, ‘बच्चे रे रहना रे बाबा, बच्चे रे रहना रे’ हे जुने प्रसिद्ध बॉलीवूड गीत पंतप्रधानानांना आठवत असेलच, असा टोलादेखील रमेश यांनी लगावला.