राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचा मेहुणा साधू यादव याला भाजपमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही, असे बिहार भाजपने स्पष्ट केले आहे. साधू यादव यांना पक्षात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी सांगितले.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची अहमदाबादमध्ये साधू यादव यांनी भेट घेतली. त्याबाबत विचारले असता सुशील मोदी यांनी वरील स्पष्टीकरण दिले. कोणतीही व्यक्ती कोणाचीही भेट घेऊ शकते, त्यावर कोणतेही र्निबध नाहीत, असेही माजी उपमुख्यमंत्री म्हणाले. साधू यादव यांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही अथवा भाजपनेही त्यांना निमंत्रण दिलेले नाही. असे असताना साधू यादव भाजपमध्ये येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.  साधू यादव यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली ही बाब मोदी हे राजद प्रमुखांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सूचित करण्यास पुरेशी आहे, असे जदचे(यू) प्रवक्ते राजीव रंजन यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेसने मात्र साधू यादव आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीला विशेष महत्त्व नसल्याचे स्पष्ट केले आहे.