Christian shot dead in Pahalgam Attack: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यापैकी २५ जण पर्यटक होते, तर एका स्थानिक घोडेस्वाराला हल्ल्यात मारले गेले. मध्यप्रदेशमधील सुनील नथानिएल यांचीही यावेळी हत्या करण्यात आली. एलआयसीमध्ये शाखा प्रबंधक असलेल्या नथानिएल यांच्या कुटुंबियांनी पहलगाम येथे घडलेला थरारक प्रसंग कथन केला आहे. सुनील नथानिएल हे १९ एप्रिल रोजी पत्नी, मुलगा आणि मुलीसह जम्मू-काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते.
सुनील नथानिएल यांचे बंधू विकास यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, मंगळवारी रात्री ९.३० वाजता त्यांना पुतण्या ऑस्टिनचा फोन आला. तेव्हा सुशील या जगात नसल्याचे त्यांना समजले.
सुशील यांच्या पत्नी जेनिफर यांनी विकास यांना घडलेला प्रसंग सांगितला. दहशतवादी अचानक आल्यानंतर त्यांनी सुशील यांना गुडघ्यावर बसवले आणि कलमा वाचण्यास सांगितले. यानंतर सुशील यांनी दहशतवाद्यांना ते ख्रिश्चन असल्याची माहिती दिली. हे सांगताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात सुशील यांचा जागीच मृत्यू झाला. तर आमची पुतणी आकांक्षाच्या पायाला गोळी लागली.
पत्नी जेनिफर यांचा २१ एप्रिल रोजी वाढदिवस होता. वाढदिवस सहकुटुंब साजरा करता यावा यासाठी नथानिएल कुटुंब जम्मू-काश्मीरला गेले होते. नथानिएल यांचा जन्म इंदूर येथे झाला होता. त्यांची पत्नी सरकारी शाळेत शिक्षिका आहे. तर मुलगी आकांक्षा सूरत येथील बँक ऑफ बडौदामध्ये उच्च पदावर कार्यरत आहे. मुलगा ऑस्टिन हा बॅडमिंटन खेळाडू आहे.
जम्मू-काश्मीरला जाण्यापूर्वी संपूर्ण कुटुंब गुड फ्रायडेनिमित्त चर्चमध्ये एकत्र आले होते.
पहलगाम येथे अचानक हल्ल्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पर्यटकांची ओळख जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हिंदू धर्मीय पर्यटकांना त्यांनी लक्ष्य केलेच. पण ख्रिश्चन असलेल्या सुनील नथानिएल यांनाही त्यांनी मारले.
कलमा म्हटल्यामुळे जीव वाचला
आसाम विद्यापीठाचे प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य हेही पहलगाम येथे हल्ल्याच्या वेळी उपस्थित होते. मात्र कलमा म्हणू शकल्यामुळे त्यांचा जीव वाचला असल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवादी माझ्याजवळ आले असताना मी मोठ्याने कलमा म्हणू लागलो, तेव्हा दहशतवाद्यांनी माझ्या शेजारी असलेल्या व्यक्तीच्या डोक्यात गोळी घातली आणि ते निघून गेले.
भट्टाचार्य पुढे म्हणाले की, दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर घोड्यांच्या खुरांच्या खुणा पाहून ते जवळजवळ दोन तास धावत होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने एका घोडेस्वाराच्या मदतीने हॉटेल गाठले.
पुलवामा येथे २०१९ साली झालेल्या हल्ल्यापेक्षाही हा भीषण हल्ला असल्यामुळे भारतासह संपूर्ण जगाला मोठा धक्का बसला आहे. निष्पाप पर्यटकांना धर्माच्या आधारावर मारल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठिराख्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी होताना दिसत आहे.