Bihar Election SP MP Sanatan Pandey: समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशमधील बलिया लोकसभेचे खासदार सनातन पांडे यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजब विधान केले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यातील जुन्या सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधाचा हवाला देत उत्तर प्रदेशच्या सीमेवर राहणाऱ्या मतदारांनी महागठबंधनला मतदान करावे, असे ते म्हणाले. बिहारच्या निवडणुकीत या लोकांनी हुंड्यात मतदान द्यावे, असे ते म्हणाले आहेत.
माध्यमांशी संवाद साधत असताना सनातन पांडे म्हणाले, बिहार उत्तर प्रदेशसाठी खास आहे. बिहारमधील छपरा, आरा आणि सिवान सारखे जिल्हे नसते तर आमच्या (उत्तर प्रदेश) येथील अर्ध्याहून अधिक मुले बिनलग्नाची राहिली असती.
आमचे बिहारशी रोटी-बेटीचे संबंध आहेत, असा सामाजिक संदर्भ पांडे यांनी दिला. बिहारींशी आमची सोयरीक असल्यामुळे बलियाचे आम्ही लोक हुंड्यात मत मागत आहोत. हुंडा म्हणून आम्हाला तुमचे मत द्या आणि राज्यात महागठबंधनचे सरकार स्थापन करण्यासाठी मदत करा, असे आवाहन पांडे यांनी केले.
समाजवादी पक्षाचे नेते पुढे म्हणाले, बिहारमधील भाजपाचे कार्यकर्ते, नेते त्यांच्या त्यांच्या पक्षात राहूनही आपल्या जुन्या संबंधांना जागून तेही महागठबंधनला मतदान करू शकतात. मी जर छपरा येथे गेलो तर तर तिथले प्रख्यात वकील अवधेश सिंह जे भाजपाचे सदस्य आहेत. ते मला भाजपाच येण्याचे आवाहन करतात. मी त्यांना हुंड्यात महागठबंधनला मतदान देण्याची विनंती करेन.
महागठबंधनने आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर केले आहे. सनातन पांडे यांनी तेजस्वी यादव यांचेही तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री असताना त्यांनी सरकारी नोकरभरती केली. यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यातील लोकांचा फायदा झाला. “तेजस्वी यादव यांनी पाच लाख लोकांना रोजगार दिला. यामुळी यूपीतील वाराणसी, बलिया, चंदौली यासारख्या जिल्ह्यातील तरूणांना मोठा लाभ मिळाला. उत्तर प्रदेशमधील तरूण जर बिहारच्या बूथवर असतील तर तेही तेजस्वी यादव यांनाच मतदान करतील”, असेही सनातन पांडे म्हणाले.
