शिवपालसिंह यांच्याकडून समाजवादी धर्मनिरपेक्ष मोर्चाच्या स्थापनेची घोषणा

सपामध्ये गेल्या काही दिवसांपासून खदखदत असलेला असंतोष शुक्रवारी पुन्हा उफाळून आला. पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवपालसिंह यादव यांनी धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन करण्याची घोषणा केली आणि त्या आघाडीचे नेतृत्व ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव करतील असेही जाहीर करून टाकले.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी तीन महिन्यांत पक्षाची धुरा मुलायमसिंह यांच्याकडे सुपूर्द न केल्यास धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन करण्याची घोषणा शिवपालसिंह यांनी केली होती. सामाजिक न्यायासाठी समाजवादी धर्मनिरपेक्ष मोर्चाची स्थापना करण्यात येईल आणि मुलायमसिंह हे त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, असे शिवपालसिंह यादव यांनी इटावाह येथे वार्ताहरांना सांगितले.

शिवपालसिंह यादव यांनी केलेली घोषणा आपल्याला माध्यमांद्वारे कळल्याचे अखिलेश यांनी सांगितले. अशा प्रकारची आघाडी स्थापन होणार असल्यास ते देशासाठी उत्तमच आहे, असे सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले.

इटावाह येथे शुक्रवारी सकाळी एका नातेवाईकाच्या निवासस्थानी मुलायमसिंह यांच्याशी चर्चा केल्यानंतर शिवपालसिंह यांनी घोषणा केली. दोन्ही नेत्यांनी नवी आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा केली. तथापि, नव्या आघाडीची भविष्यातील रूपरेषा काय असेल ते शिवपालसिंह यांनी स्पष्ट केले नाही. नवी आघाडी सपाविरुद्ध निवडणूक लढणार की समाजवादी विचारवंतांना एका छताखाली आणणार तेही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

पक्षाची धुरा मुलायमसिंह यांच्याकडे सुपूर्द करण्याचे आश्वासन अखिलेश यांनी दिले होते. त्यांनी आश्वासनाची पूर्तता करावी आणि आम्ही सर्व जण पक्ष बळकट करू, आपण त्यांना तीन महिन्यांचा कालावधी दिला होता. मात्र त्यांनी मुलायमसिंह यांच्याकडे पक्षाची धुरा सुपूर्द केली नाही, त्यामुळे आपण नवी आघाडी स्थापन करणार आहोत, असे शिवपालसिंह म्हणाले.