समलिंगी विवाहांना भारतात कायदेशीर मान्यता मिळण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या दरम्यान चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एक महत्त्वाची टिपण्णी केली आहे. त्या टिपण्णीची चर्चा सुरू झाली आहे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की समलिंगी संबंध हे आता एकावेळचं नातं नाही. तर ते कायमस्वरूपी टिकेल असं नातं आहे.

काय म्हटलं आहे चंद्रचूड यांनी?

“समलिंगी संबंध हे एका वेळचं नातं नाही तर आता हे नातं कायमस्वरूपी टिकणारं नातं असणार आहे. हे नातं शारीरिक, भावनिकदृष्ट्या होणारं मिलन आहे. ६९ वर्षांपूर्वीच्या स्पेशल मॅरेज अॅक्टच्या कक्षा रूंदावण्याचा विचार करणं यात काहीही चूक नाही.” असं चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाले चंद्रचूड?

“मागच्या ६९ वर्षांमध्ये समाज आणि कायदा विकसित झाले आहेत. अशात स्पेशल मॅरेज अॅक्ट मध्ये बदल करणं हे काही गैर नाही. नव्या गोष्टी आत्मसात केल्या गेल्या पाहिजेत. आपण मूळ व्याखेला बांधून राहू शकत नाही, त्याचा विस्तार केला गेला पाहिजे.”

समलिंगी विवाहासाठी स्पेशल मॅरेज अॅक्टमध्ये सुधारणा करता येऊ शकते. प्रश्न हा आहे की जर एक पुरुष आणि एक स्त्री यांच्यातले शारीरिक संबंध हे मौलिक मानले जातात तर मग त्याचप्रमाणे आपण समलिंगी संबंधांना समाविष्ट का करू शकत नाही? स्पेशल मॅरेज अॅक्ट १९५४ चा उद्देश विवाहांना संमती देणं हा होता. जर समलिंगी संबंध हे गुन्हा नाहीत अपराधाच्या श्रेणीतून त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. अशावेळेस हे लक्षात घेतलं पाहिजे की समलिंगी संबंध हे एकवेळचे संबंध नाहीत. ते स्थायी स्वरूपाचे संबंध असतात. भावनिकदृष्ट्याही ते मिलन तेवढंच महत्त्वाचं असतं असं मत चंद्रचूड यांनी व्यक्त केलं आहे.