Sanjay Raut on Vice President of India Jagdeep Dhankhar : देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत? असा प्रश्न शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. राऊत म्हणाले, “देशातील इतक्या मोठ्या पदावरील व्यक्ती गेल्या २० दिवसांपासून बेपत्ता आहे. त्यांचं काय झालं? त्यांची प्रकृती कशी आहे? याबाबत देशातील जनतेच्या मनात चिंता निर्माण झाली असून केंद्रीय गृहमंत्र्यांनी समोर येऊन जनतेला उत्तरं द्यावीत.” राऊत यांनी दावा केला आहे की “माझ्यासह इतर काही राज्यसभा सदस्यांनी धनखड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु,आमचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आम्ही त्यांच्या घरी देखील गेलो होतो. परंतु, आम्हाला आत जाऊ दिलं नाही.”

संजय राऊत म्हणाले, “जगदीप धनखड ज्या पद्धतीने बेपत्ता झाले आहेत, त्यामुळे ही राजकीय कार्यकर्त्यांसाठी चिंतेची बाब आहे. या देशात चीन व रशियासारखा पॅटर्न राबवला जात आहे का? सरकारला नको असलेली माणसं गायब केली जात आहेत का? सरकारने तसा कायदा केला असेल तर आम्हाला त्याविषयी माहिती द्यावी. कोणी आमच्याविरोधात बोललं, वागलं, कृती केली तर आम्ही त्यांना गायब करू असं सरकारने एकदाचं स्पष्ट करून टाकावं.”

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले, “उपराष्ट्रपती २१ जुलै रोजी सभागृहात आले होते. सभागृहात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे व उपराष्ट्रपतींमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’वरून शाब्दिक खटके उडाले. त्यानंतर उपराष्ट्रपतींनी सभागृहाचं काम दिवसभरासाठी तहकूब केलं. तेव्हा त्यांची प्रकृती उत्तम होती. त्यानंतर अचानक सायंकाळी सहा वाजता त्यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला, तेव्हापासून त्यांचा थांबपत्ता लागलेला नाही. एवढ्या मोठ्या संवैधानिक पदावर बसलेली व्यक्ती अचानक बेपत्ता होते, याबाबत गृहमंत्र्यांनी जनतेला माहिती द्यावी. किंवा त्यांनी जनतेला सांगावं की आपले उपराष्ट्रपती अमुक ठिकाणी सुखरुप आहेत. तुम्ही त्यांना भेटू शकता, त्यांच्याशी संवाद साधू शकता.

“आतापर्यंत धनखड यांच्याशी कोणाचाही संपर्क होऊ शकलेला नाही? ते नजरकैदेत आहेत का? त्यांना बंदिवान करून ठेवलंय का? त्यांना काय झालंय? देशाचा नागरिक, संसदेतील सदस्य म्हणून आम्ही प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारने त्या प्रश्नांची उत्तरं द्यावी.”

खासदार राऊत म्हणाले, “आम्ही धनखड यांच्या घरी गेलो होतो. मात्र आम्हाला आत जाऊ दिलं नाही.”