scorecardresearch

“पंतप्रधान नरेंद्र मोदी अदाणींना ‘हग’ करून बसलेत आणि आम्हाला मिठ्या मारायला…”, Cow Hug Day वरून संजय राऊतांची टोलेबाजी!

राऊत म्हणतात, “आमची याकडे बघण्याची इच्छाच नाहीये. कारण त्यांची ‘होली काऊ’ म्हणजे अदाणी. अदाणींना ‘हग’ करून ते बसले आहेत. त्याला आम्ही…!”

sanjay raut pm narendra modi gautam adani
संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला Cow Hug Day जाहीर करून या दिवशी गायींना मिठी मारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारमधील प्राणीसंवर्ध मंडळाकडून देण्यात आला आहे. या प्रस्तावावर केंद्र सरकार सकारात्मक विचार करत असताना त्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रेमी युगुलांसाठी हा दिवस खास असून या दिवशी गोमातेवरील आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘काऊ हग डे’ साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. गुरुवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना याबाबत विचारणा करण्यात आली असता त्यांनी खोचक शब्दांत मोदींना टोला लगावला आहे. यावेळी संजय राऊतांनी गौतम अदाणींचाही उल्लेख केला.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊतांना ‘Cow Hug Day’संदर्भातल्या आवाहनाबाबत विचारणा केली असता त्यांनी मोदींवर खोचक टीका केली. “आमची याकडे बघण्याची इच्छाच नाहीये. कारण त्यांची ‘होली काऊ’ म्हणजे अदाणी. अदाणींना ‘हग’ करून ते बसले आहेत. त्याला आम्ही ‘होली काऊ’ म्हणतो. एवढ्या मोठ्या ‘काऊ’ला त्यांनी ‘हग’ केल्यामुळे दुसऱ्या गायींचं या देशात काय राहिलंय? आम्हाला अदाणीला ‘हग’ करता येत नाही, म्हणून आमच्यासाठी त्यांनी गायी सोडल्या आहेत. पण गाय गोमाता आहे, त्या गोमातेचा आम्ही आदर करतो”, असं संजय राऊत म्हणाले.

“आम्हाला त्यांनी मिठ्या मारायला गायी दिल्या आहेत आणि ते अदाणी नावाच्या ‘होली काऊ’ला मिठ्या मारत आहेत”, असा टोलाही त्यांनी शेवटी लगावला.

“…यामागे सरकारचा नक्की डाव काय आहे?” देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत संजय राऊतांचं शिंदे सरकारवर टीकास्र!

वरळीतल्या ‘त्या’ सभेवरून मुख्यमंत्र्यांना टोला!

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊतांनी वरळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या सभेवरूनही खोचक टोला लगवला. “वरळीत ‘व्यवस्थित कार्यक्रम’ झालाय. तिथे दहशतीनं माणसं गोळा करण्याचा प्रयत्न झाला. पण दहशतीला न जुमानता लोक घरात बसले. कोळी समाजाच्या टोप्या घालून कुणाला आणलं ते आपण पाहिलं असेल. त्यामुळे शिवसैनिक, जनता या मिंधे गटासोबत जाणार नाही, गेलेले नाहीत. याची समज भाजपालाही आली आहे. याचा फटका विधानसभा, लोकसभा आणि प्रत्येक निवडणुकीत भाजपाला बसणार आहे. कसबा आणि पिंपरी पोटनिवडणुकीत याचं चित्र दिसेल”, असं राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 11:49 IST
ताज्या बातम्या