Sanjay Raut on Nepal Voilent Protest: भारताच्या उत्तरेला लागून असलेल्या नेपाळमध्ये काही दिवसांपासून हिंसक आंदोलन सुरू आहे. तेथील आंदोलकांनी संसद, शासकीय इमारती, आजी-माजी पंतप्रधानांच्या घरांना लक्ष्य केले आहे. यामुळे विद्यमान पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी भारतालाही सावध राहण्याचा इशारा दिला आहे. एक्सवर पंतप्रधान मोदी यांना टॅग करून त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची आता चर्चा होत आहे.
संजय राऊत यांनी एक्सवर नेपाळमधील हिंसाचाराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तेथील अर्थमंत्र्यांना रस्त्यावर पळवून पळवून मारले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये राऊत यांनी लिहिले, “ही परिस्थिती कोणत्याही देशात उद्भवू शकते. सावध व्हा. भारत माता की जय, वंदे मातरम!”
या पोस्टमध्ये राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनाही टॅग केले आहे. नेपाळमधील परिस्थितीवरून राऊत यांनी पंतप्रधान आणि भाजपावर टीका केल्याचे सांगितले जाते.
गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात जनआंदोलन सुरू आहे. सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर सुरू झालेल्या आंदोलनाने हिंसक रूप धारण केले. यात जवळपास २० आंदोलक तरूणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर आंदोलकांनी शासकीय इमारती, संसद, माजी नेत्यांच्या घरांना आग लावली आहे.
योगायोग म्हणजे भारताला सीमा लागून असलेल्या श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र असंतोष पसरल्याचे चित्र दिसले होते. त्याचप्रकारचे चित्र आता नेपाळमध्ये दिसत आहे. तर पाकिस्तानमध्येही अशाच प्रकारची खदखद सामान्य जनतेमध्ये आहे.
भारतातही वेगळी परिस्थिती नाही
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटले की, भारतातही नेपाळहून वेगळी परिस्थिती नाही. वर वर पाहता सगळे काही चांगले चालू असल्याचे दाखवले जाते. लोकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे सरकारने खबरदारी घेणे गरजेचे आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
भारत कमजोर पडल्यामुळेच…
दरम्यान सामनाच्या आजच्या अग्रलेखातही संजय राऊत यांनी नेपाळमधील संघर्षाचा उल्लेख करत भारताच्या परराष्ट्र धोरणाला लक्ष्य केले आहे. “एकेकाळी नेपाळमध्ये नवे सरकार आले की, तेथील पंतप्रधान सगळ्यात आधी भारत भेटीवर येत. आज नेपाळचे पंतप्रधान आधी चीन दौऱ्यावर आणि नंतर पाकिस्तानात जातात. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे. भारताने आमच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा घेतला आहे, असा कांगावा करण्यापर्यंत नेपाळची मजल गेली ती भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर कमजोर पडल्यामुळेच”, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.