नवी दिल्ली : ‘ज्येष्ठ पत्रकार, ‘द टेलिग्राफ’चे संपादक संकर्षण ठाकूर यांचे सोमवारी दीर्घ आजाराने गुरुग्राम येथील रुग्णालयात निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते.
दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी मिळवल्यानंतर १९८४ मध्ये ठाकूर यांनी ‘संडे’ मासिकातून पत्रकारितेला सुरुवात केली. ‘इंडियन एक्स्प्रेस’, ‘तहलका’ आणि ‘द टेलिग्राफ’ यांसह अनेक माध्यमसमूहात त्यांनी काम केले. तीक्ष्ण राजकीय भाष्य आणि संवेदनापूर्ण लिखाणासाठी ओळखले जाणारे ठाकूर हे भारताच्या राजकारणाचे विशेषत: बिहारच्या राजकारणाचे अभ्यासक होते.
ठाकूर यांनी राज्यातील प्रमुख राजकीय व्यक्तींची चरित्रेही लिहिली. माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावरील ‘सबाल्टर्न साहेब’ हे राजकीय चरित्र लिहिले. त्याशिवाय मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरील ‘सिंगल मॅन: द लाइफ अँड टाइम्स ऑफ नितीश कुमार ऑफ बिहार’ हे चरित्र आणि यादव व नितीश यांच्या संबंधांवरील ‘द ब्रदर्स बिहारी’ ही पुस्तके अधिक गाजली. त्यांच्या निधनाबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, काँग्रेस नेते जयराम रमेश आणि राजदचे नते मनोज कुमार झा यांनी शोक व्यक्त केला.