देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे आणखी काही काळ जगले असते, तर गोवा पोर्तुगीजांच्या राजवटीतून बराच आधी स्वतंत्र झाला असता, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

गोवा स्वतंत्र होण्यापूर्वी बरेच आधी भारताला स्वातंत्र्य मिळाले असले, तरी देशातील लोक ते त्या वेळी त्याचा आनंद घेऊ शकले नाहीत, कारण देशाचा एक भाग अद्यापही परदेशी राजवटीखाली असल्यामुळे ते अस्वस्थ होते, असेही मोदी म्हणाले.

भारताच्या सशस्त्र दलांनी १९६१ साली ज्या दिवशी गोव्याला पोर्तुगीजांच्या राजवटीतून मुक्त केले, त्यानिमित्त दरवर्षी १९ डिसेंबरला साजऱ्या केल्या जाणाऱ्या गोवा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. ‘सरदार वल्लभभाई पटेल हे आणखी काही काळ जगले असते, तर गोवा आधीच स्वतंत्र झाला असता,’ असे मोदी म्हणाले.

नेहरू मंत्रिमंडळात उपपंतप्रधान असलेले पटेल हे १५ डिसेंबर १९५० रोजी मरण पावले. महाराष्ट्रातील मराठवाडा हा भाग निझामाच्या राजवटीतून स्वतंत्र करण्याचे श्रेय त्यांना आहे. यापूर्वी भाजपच्या अनेक नेत्यांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना गोवामुक्तीसाठी झालेल्या उशिराबद्दल दोष दिला आहे.