टोलनाका माझ्या नावावर नाही तर तो रिलायन्स कंपनीच्या नावावर आहे. अंबानी माझे काका, मामा अथवा नातेवाईक लागत नाहीत. सत्ताधार्यांनी अंबानी, अदानी यांना देश विकला आहे. राष्ट्राची संपत्ती विकली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. ते वाई तालुक्यात पाचवड येथील सभेत बोलत होते. यावेळी आमदार मकरंद पाटील, प्रतापराव पवार, मंगल दास बांदल, पंचायत समिती सभापती रजनी पाटील आदी उपस्थित होते.
काही लोक वयाने मोठे असतात म्हणून आपण त्यांचा आदर करतो. ज्यांनी सर्वांना मार्गदर्शन कारायचे त्यांच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. मदन भोसले यांच्या विषयी ते म्हणाले दादा चुकीच्या लोकांच्या नादी लागले आहेत त्याचे परिणाम त्यांच्या तोंडी दिसत आहेत असे उदयनराजे म्हणाले.
सत्ताधार्यांनी लोकांना मन की बात सांगत लोकांना मूर्ख बनवलं. फसव्या घोषणा केल्या. १५ लाख नाही, नोकर्या नाही अशा अनेक घोषणा केल्या. लोकांनी सुरुवातीपासून खोट बोलणार्यांवर विश्वास ठेवला. सध्या हे हुकुमशाही पद्धतीने वागत आहेत हीच वेळ आहे त्यांची त्यांना जागा दाखविण्याची. संपूर्ण देश नोटबंदी आणि जीएसटी लावून वेठीस धरला. काय अधिकार आहे यांना लोकांच मानसिक खच्चीकरण करण्याचा? असा सवाल उदयनराजेंनी केला.