हेपॅटिटिस बी, घटसर्प यासारख्या रोगांवरील पंचगुणी लशीवर बंदी घालावी, अशी मागणी करणाऱ्या लोकहिताच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडे प्रतिसाद मागितला आहे. सरन्यायाधीश पी.सतशिवम यांच्या नेतृत्वाखालील पीठाने याबाबत केंद्र सरकारला नोटीस दिली आहे. डॉ. योगेश जैन यांनी या पंचगुणी लशीवर बंदी घालण्याची याचिका दाखल केली असून त्यात, या लशीमुळे अनेक विपरीत परिणामही होतात, या लशीमुळे २१ मुलांचा मृत्यूही झाला. सरकारने त्याबाबत चार आठवडय़ात म्हणणे मांडावे असे पीठाने म्हटले आहे. ज्येष्ठ वकील कोलिन गोन्सालविस यांनी डॉ.जैन यांच्यावतीने बाजू मांडताना सांगितले की, अमेरिका, जपान, पाकिस्तान, श्रीलंका, आदी देशांनी या लशीवर बंदी घातली आहे.
धनुर्वात, हेपॅटिटिस बी आणि एच, घटसर्प, डांग्या खोकला, इन्फ्लुएंझा बी या पाच रोगांवर या लशीमुळे संरक्षण मिळते. ही लस प्रथम तामिळनाडू व केरळात २०११ मध्ये वापरण्यास परवानगी देण्यात आली. देशात एकूण २१ मुलांचा या लशीमुळे मृत्यू झाला होता.  
यावर्षी ४ मे रोजी व्हिएतनाममध्ये क्विनव्हॅक्सेम या पंचगुणी लशीवर बंदी घालण्यात आली होती, तेथे १२ जणांचा मृत्यू झाला होता. भूतान, श्रीलंका, पाकिस्तान या देशातही लसीकरणानंतर काही मुलांचे मृत्यू झाले असून तेथेही त्यावर बंदी घालण्यात आली आहे.