न्यायालयाच्या आदेशांना धुडकावून लावत केवळ स्वतःच्या सुटकेसाठी प्रयत्नशील असलेल्या सहाराप्रमुख सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी पुन्हा एकदा जोरदार दणका दिला. स्वतःच्या अटकेविरोधात सुब्रतो रॉय यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका पुन्हा एकदा फेटाळण्यात आली. न्यायालयाने रॉय यांना यावेळी खडे बोल सुनावले.
उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले सर्वच आदेश रॉय आणि सहारा समूहाने पायदळी तुडवले आहेत, हे स्पष्ट दिसते आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेशही रॉय यांनी पद्धतशीरपणे धुडकावून लावले असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने दिलेले आदेश कोणत्याही स्थितीत पाळले गेलेच पाहिजे. आदेश धुडकावून लावणे म्हणजे कायदाच न पाळण्यासारखे आहे, असेही न्यायालयाने रॉय यांना सुनावले. त्यानंतर त्यांची याचिका फेटाळून लावली.
गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने रॉय यांनी तुरुंगात रवानगी केली आहे. गुंतवणूकदारांचे पैसे कसे परत करणार याचा सविस्तर आराखडा दिल्याशिवाय जामीन देता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.