Nawab Malik News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयातील नवाब मलिक यांच्या जामिनावर सुनावणी होईपर्यंत नवाब मलिक यांना वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणांसाठी तात्पुरता जामीन दिला होता. मलिक यांनी अर्जात किडनी, यकृत, हृदय याच्याशी संबंधित व्याधी असल्याचं नमूद केलं होतं. आता नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन सर्वोच्च न्यायालयाने कायम केला आहे. त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जातो आहे.

नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

नवाब मलिक ( Nawab Malik ) यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालय निकाल देत नाहीत तोपर्यंत ते बाहेरच असणार आहे. न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्या समोर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात त्यावेळी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंनी अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे असा संघर्ष दिसून आला होता. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे लाच घेण्यासाठी हे सगळं करतात, तसंच त्यांचं जात प्रमाणपत्रही खोटं आहे असेही आरोप नवाब मलिक ( Nawab Malik ) यांनी केले होते. यानंतर त्यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली. दाऊदशी संबंधित सलीम फ्रूटशी व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. ज्यानंतर त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा वैद्यकीय जामीन कायम केला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा तुरुंगात जावं लागणार नाही. मुंबई उच्च न्यायालय निर्णय देईपर्यंत नवाब मलिक तुरुंगाबाहेरच असणार आहेत. बार अँड बेंचने हे वृत्त दिलं आहे.

ईडीने का केली होती अटक?

ईडीनं २०२२ मध्ये गोवावाला कंपाऊंड जमीन व्यवहार प्रकरणांत मनी लाँड्रिंग कायद्यान्वये नवाब मलिक ( Nawab Malik ) यांना अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. त्यानंतर ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांना अटीशर्थींसह जामीन मिळाला. प्रकृतीचं कारण देत जामीन मिळावा, अशी मागणी तेव्हा त्यांनी केलेली. कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणादरम्यान मलिक चांगलेच चर्चेत आले होते. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आरोपी होता. मात्र, एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे मलिक तेव्हा चर्चेचा विषय ठरले होते.

हे पण वाचा- Sanjay Raut: “देवेंद्र फडणवीसांमुळेच राज्यात डर्टी पॉलिटिक्स” संजय राऊत यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवाब मलिक कोणत्या राष्ट्रवादीत?

नवाब मलिक तुरुंगातून बाहेर येईपर्यंत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली होती. अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले. अधिवेशन सुरु असताना नवाब मलिक ( Nawab Malik ) अजित पवारांच्या बाजूने जे नेते बसतात त्या बाकांवर बसले होते. ज्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांच्यावर पत्रकार परिषद घेत आरोप केले होते. टीका झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना पक्षात न घेण्याबद्दल अजित पवार यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर नवाब मलिक यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे नवाब मलिक हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत की अजित पवारांच्या ? हा प्रश्न अद्याप कायम आहे.