नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू असताना सरन्यायाधीश न्या. भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या वकिलावर अवमान कारवाई करण्याचा कोणताही विचार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. “खुद्द न्या. गवई यांनीच या वकिलाविरोधात कोणतीही कारवाई करायला नकार दिला होता,” असे न्या. सूर्य कांत आणि न्या. जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने सांगितले.
न्यायालयाच्या कामकाजादरम्यान घोषणा देणे आणि बूट फेकणे हे प्रकार स्पष्टपणे न्यायालयाचा अपमान करणारे आहेत. पण या प्रकरणी कारवाई करायची की नाही, हा निर्णय संपूर्णपणे त्यावेळी न्यायदान करत असलेल्या न्यायाधीशांवर अवलंबून असतो असे खंडपीठाने सांगितले. न्या. गवई यांच्यावर ६ ऑक्टोबरला बूट फेकणारे ७१ वर्षीय ॲड. राकेश किशोर यांच्याविरोधात अवमान कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांच्या संघटनेने (एससीबीए) दाखल केली होती. त्यावर सोमवारी सुनावणी झाली.
अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी मार्गदर्शक सूचना आखून देण्याचा विचार केला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. यावेळी न्यायाधीशांनी देशभरात निरनिराळ्या न्यायालयांमध्ये बूट फेकण्यासारख्या घटनांबद्दल अधिक तपशील संकलित करण्याचे निर्देश महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांना दिले.
अवमान नोटीस बजावल्याने सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाला अवाजवी महत्त्व दिले जाईल, तसेच यामुळे या घटनेची चर्चा अधिक काळ होत राहील. अशा घटना नैसर्गिकरित्या विस्मृतीत जाऊ द्याव्यात. – सर्वोच्च न्यायालय
