महात्मा गांधी यांच्या तोंडी अश्लील व अभिरुचीहीन शब्द घालत ‘गांधी मला भेटला’ या कवितेची निर्मिती करणारे कवी वसंत गुर्जर यांच्यावर गुन्हेगारी स्वरुपाचा खटला दाखल करण्याची मागणी फेटाळून लावत ही कविता प्रकाशित करणारे देविदास तुळजापूरकर यांनी याप्रकरणी आधीच माफी मागितली असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी या प्रकरणावर पडदा टाकला.
वसंत गुर्जर यांनी लिहिलेली ‘गांधी मला भेटला’ ही कविता देविदास तुळजापूरकर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र कामगार संघटनेच्या मासिकाच्या १९९४च्या अंकात छापली होती. त्यावरून वाद निर्माण झाल्यावर तुळजापूरकर यांनी लगेचच पुढील अंकात माफी मागितली होती. मात्र, पतित पावन संघटनेचे सदस्य विद्याधर अनास्कर यांनी याविरोधात खटला दाखल केला होता. महात्मा गांधींसारख्या आदरणीय व्यक्तीच्या तोंडी अश्लील शब्द घालून साहित्यनिर्मिती करणे हा गुन्हा असून त्यामुळे महात्माजींची प्रतिमा मलीन होत असल्याचे याचिकाकर्त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच कवी व प्रकाशकांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपक मिश्रा व प्रफुल्लचंद्र पंत यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. तुळजापूरकर यांनी मासिकाच्या पुढील अंकात लगेचच बिनशर्त माफी मागितल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणे योग्य ठरत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, कवीविरोधातील मागणीसंदर्भात कोणतेही मतप्रदर्शन करण्याचे खंडपीठाने टाळले. कवीने सत्र न्यायालयातच कवितेतील मजकुराबाबत खुलासा करावा, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. दरम्यान, याबाबत मूळ तक्रारदार व बँकिंग साक्षरता प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर म्हणाले की, ‘वीस वर्षांपूर्वी मी केवळ दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली होती. संबंधितांनी ती आता सर्वोच्च न्यायालयात मान्य केली. उशीर लागला तरी कायदेशीर लढय़ास न्याय मिळाला ही सामान्य माणसाला बळ देणारी बाब आहे.दरम्यान, दिलगिरी विचारात घेऊन दोषमुक्त करण्याचा निर्णय व्यक्तिश: दिलासा देणारा असला, तरी या निमित्ताने काही नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न भाषिक आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आता कवितेवरील खटला लातूर येथे चालविला जाईल, असे म्हटले आहे. त्यामुळे कवितेच्या गाभ्याचे प्रश्न अजूनही शिल्लक आहेतच. असे ‘बुलेटिन’ मासिकाचे मुख्य संपादक देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले.
महात्मा गांधी यांच्यासारख्या ऐतिहासिकदृष्टय़ा आदरणीय व्यक्तिमत्त्वांविरुद्ध असभ्य भाषा वापरण्याची कुणालाही मुभा दिली जाऊ शकत नाही.
– सर्वोच्च न्यायालय