नवी दिल्ली:आपल्या सरकारच्या दुसऱ्या पर्वातील दुसऱ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनामुळे अनाथ झालेल्या लहान मुलांसाठी शनिवारी अनेक कल्याणकारी घोषणा केल्या. ही लहान मुले जेव्हा १८ वर्षांची होतील तेव्हा त्यांच्यासाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा आणि त्यांच्या शिक्षणाचा या योजनांमध्ये समावेश आहे.

अनाथ झालेल्या मुलांना कशा पद्धतीने मदत करता येईल याबाबत चर्चा करण्यासाठी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. त्यामध्ये या मुलांना ‘पीएम-केअर्स फॉर चिल्ड्रन’ योजनेखाली मदत करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. अनाथ मुलांच्या नावाने मुदतठेवी उघडण्यात येणार असून ही मुले जेव्हा १८ वर्षांची होतील तेव्हा त्यांना १० लाख रुपये कसे उपलब्ध होतील या दृष्टिकोनातून पीएम-केअर्स फंड त्यामध्ये योगदान देणार आहे, असे पंतप्रधानांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या दहा लाख रुपयांमधून पुढील पाच वर्षे या मुलांना दरमहा आर्थिक मदत केली जाणार आहे. त्यानंतर ही मुले २३ वर्षांची झाल्यानंतर त्यांना १० लाख रुपये एकरकमी दिले जाणार आहेत. या कठीण काळात समाज म्हणून अशा मुलांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे, असे मोदी म्हणाले.