इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स अर्थात इंडियाच्या समन्वय समितीची पहिली बैठक आज शरद पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे. या बैठकीच्या अजेंड्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काय तयारी करायची आणि जागावाटपचा फॉर्म्युला नेमका कसा असेल यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आहे.
जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार?
इंडिया आघाडीच्या समन्वय समितीत विविध पक्षांच्या १४ नेत्यांचा समावेश आहे. आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार भाजपा उमेदवाराच्या विरोधात विरोधी पक्षांकडून म्हणजेच इंडिया आघाडीकडून संयुक्त उमेदवार केला जावा, यासाठी जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जागावाटप नेमकं कोणत्या निकषांवर ठरवलं जाईल त्याबाबतचा निर्णय हा अद्याप घेण्यात आलेला नाही. भाजपाविरोधात जेव्हा उमेदवार देऊ तेव्हा तो तशाच ताकदीचा असला पाहिजे आणि त्याच्या प्रचारासाठीही व्यवस्थित वेळ दिला गेला पाहिजे यावरही इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराची टॅगलाईन काय असेल? प्रचार नेमका कसा केला जाईल? या गोष्टींवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
आपचे राघव चढ्ढा यांनी काय म्हटलं आहे?
आज पार पडणाऱ्या बैठकीपूर्वी समन्वय समितीचे सदस्य आणि आपचे नेते राघव चढ्ढा म्हणाले लोकांपर्यंत पोहचण्यासाठी संयुक्त रॅलीज, घरोघरी प्रचार याबाबतच्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा करू. तसंच प्रत्येक पक्षाला असलेली राजकीय महत्त्वाकांक्षा, आपसातले मतभेद आणि मतभिन्नता यांचा त्याग करावा लागेल. तरच आपण भाजपाला टक्कर देऊ शकू.