हैदराबाद : तेलंगणामधील सिकंदराबाद शहरात मोटारसायकलच्या शोरूमला लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेले नागरिक या शोरूमच्या वर असलेल्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. बाहेर पडण्यासाठी केवळ एकच मार्ग असल्याने काही जण अडकून पडले आणि त्यांचा श्वास कोंडल्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या दुर्घटनेत दहा जण जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. या हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या एका नागरिकाने पोलीस तक्रार केली आहे. त्याला हॉटेलच्या तळघरातून धूर आणि आग लागल्याचे दिसल्याचे त्याने सांगितले. त्याच्यासह चार जणांनी पाचव्या मजल्यावरून समोरच्या इमारतीवर जात स्वत:ची सुटका करून घेतली आणि त्यानंतर १०० क्रमांकावर संपर्क साधून आग लागल्याची माहिती दिली.
‘‘मोटारसायकलच्या शोरूम आणि हॉटेलचा मालक एकच असून रूबी प्राइड असे हॉटेलचे नाव आहे. या चार मजली हॉटेलमध्ये २३ खोल्या असून शोरूमला आग लागल्यानंतर धूर वरच्या मजल्यांपर्यंत पसरला. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर झोपलेले काही नागरिक दाट धुरातून कॉरिडॉरमध्ये आले आणि श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला,’’ असे हैदराबादचे पोलीस आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर सांगितले. आग लागली त्यावेळी हॉटेलमध्ये २५ जण वास्तव्यास होते, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तेलंगणाचे मंत्री के. टी. रामाराव यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला आणि केंद्र व राज्य सरकारच्या वतीने मदतनिधी जाहीर केला. पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी अंतर्गत केंद्र सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये जाहीर केले. तेलंगणा सरकारनेही मृतांच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपये जाहीर केले.
आग कशामुळे?
आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मोटारसायकलच्या शोरूममधील ई-बाईक किंवा जनित्राचा स्फोट होऊन आग लागल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ई-बाईकचा शोरूम बेकायदा असून गेल्या वर्षभरापासून तो चालविला जात आहे. पोलिसांनी या शोरूम आणि हॉटेलच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.