गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी Kashmir Terror Attack हल्ल्यांत वाढ झाल्यामुळे सुरक्षा दलांनी गुरूवारी दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. शोपिया जिल्ह्यातील सुमारे २० गावांना रिकामे करण्यात आले असून गावांमध्ये शोध अभियान सुरू करण्यात आले आहे. गतवर्षी हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानी चकमकीत ठार झाल्यानंतर निर्माण झालेल्या हिंसक आंदोलनानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात दहशतवादविरोधी ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

शोपियांमध्ये खुलेआमपणे दहशतवादी फिरतानाचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी ऑपरेशन सुरू केले आहे. गुरूवारी सकाळी सुरू झालेल्या या ऑपरेशनमध्ये लष्कर, निमलष्करी दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे सुमारे २५०० ते ३००० जवान सहभागी आहेत.
यापूर्वी दक्षिण शोपियांमध्ये बुधवारी रात्री उशिरा संशयित अतिरेक्यांनी कोर्ट कॉम्पलेक्सच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर हल्ला करत ५ सर्व्हिस रायफल लुटून नेल्या होत्या. दहशतवाद्यांनी ४ इन्सास रायफल आणि १ एके ४७ रायफलही लुटली होती. त्याचबरोबर बुधवारीच पुलवामा येथे २ तासात २ बँका लुटण्यात आल्या होत्या.
पुलवामाचे पोलीस अधीक्षक रईस मुहम्मद भाट यांनी बँक लुटीमध्ये दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा हात असल्याचे सांगितले. आतापर्यंत पद्गपुरा आणि खगपुरा येथील दोन दहशतवाद्यांची ओळख पटली असून यावरून या घटनेमागे लष्कर ए तोयबाचा हात असल्याचे सिद्ध होते, असे त्यांनी सांगितले.

 


ते म्हणाले, सध्या दहशतवादी संघटनांना पैशांची कमतरता भासत आहे. त्याचबरोबर या संघटनाकडून मोठ्याप्रमाणात अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर होताना दिसत आहे. याचा आम्ही तपास करत आहोत. यापूर्वी १ मे रोजी दहशतवाद्यांनी कुलगाम येथे एक कॅश व्हॅन लुटली होती. या घटनेत ५ पोलीस आणि २ बँक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी पोलिसांचे हत्यारेही लुटले होते.