रविवारी पहाटे सुरक्षा दलाने जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये एक पाकिस्तानी ड्रोन पाडलं आहे. या ड्रोनला सात मॅग्नेटीक बॉम्ब आणि UBGL ग्रेनेड्स लावण्यात आले होते. पाकिस्तानी सीमेतून या ड्रोनने भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार करत हे ड्रोन खाली पाडलं आहे.

याबाबत अधिक माहिती देताना कठुआ जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग म्हणाले की, “कठुआ जिल्ह्यातील राजबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तल्ली हरिया चक परिसरात ड्रोनच्या हालचाली वाढल्या होत्या. यामुळे दररोज सकाळी पोलिसांचं एक पथक या भागात नियमितपणे पाठवलं जात होतं. आज पहाटे सुरक्षा दलाच्या या पथकानं पाकिस्तानी सीमेतून एक ड्रोन येत असल्याचं पाहिलं. त्यानंतर त्यांनी त्वरित ड्रोनच्या दिशेनं गोळीबार केला. ”

सुरक्षा दलाला हे पाकिस्तानी ड्रोन खाली पाडण्यात यश आलं. या ड्रोनसोबत सात चुंबकीय (मॅग्नेटीक) बॉम्ब आणि सात यूबीजीएल (अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चर) ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. घटनास्थळी बॉम्ब निकामी पथक दाखल झालं आहे. पुढील तांत्रिक तपास केला जात आहे. विशेष म्हणजे हरिया चक हा परिसर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी नेहमीच पसंतीचा मार्ग राहिला आहे.

खरंतर, ३० जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेच्या मार्गक्रमणावर सुरक्षा वाढवली आहे. असं असतानाही जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. नुकत्यात घडलेल्या घटनेमुळे सुरक्षा दले सतर्क झाली आहेत.