नवी दिल्ली : राहुल गांधींविरोधातील निकालावर स्थगिती आणण्यासाठी काँग्रेसची धावपळ सुरू झाली आहे. ‘शिक्षेचा निकाल चुकीचा असून तो वरिष्ठ न्यायालयात फेटाळला जाण्याची शक्यता आहे, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ता व ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

राहुल गांधींनी कर्नाटकातील कोलारमध्ये भाषण केले होते, त्याचा गुजरातमधील सूरतशी काहीही संबंध नाही. अधिकारक्षेत्राबाहेरील तक्रारीवर खटला चालवणे हा खोडसाळपणा आहे. भाजपने जाणीवपूर्वक राजकीय खेळ केल्याचा आरोप सिंघवी यांनी केला. राहुल गांधींचे भाषण महागाई आणि बेरोजगारीसंदर्भात होते. राजकीय नेता म्हणून त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाषण केले होते. त्यामुळे त्यांच्या भाषणातून कोणाचीही बदनामी करण्याचा हेतू नव्हता हे स्पष्ट होते. तरीही कनिष्ठ न्यायालयाने अब्रुनुकसानीच्या खटल्यात राहुल गांधींना दोषी धरले आहे. या निकालामध्ये त्रुटी असून कायद्याच्या कसोटीवर तो टिकणार नाही, असे सिंघवी म्हणाले.

काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन

सुरतचे कनिष्ठ न्यायालय निकाल जाहीर करणार असल्याने राहुल गांधी गुरुवारी सकाळी सुरतला पोहोचले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर त्याचे पडसाद दिल्लीसह अन्य शहरांमध्येही उमटले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या तुघलक रोडवरील निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजनाथ सिंह, अमित शहा लक्ष्य काँग्रेसचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे ठरवले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत राहुल गांधींना उद्देशून केलेल्या विधानाचा संदर्भ देत काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनी राजनाथ यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दिली आहे. राजनाथ यांनी राहुल गांधींना सल्ला देण्यापेक्षा हक्कभंगाची कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न करावेत, असा टोला जयराम रमेश यांनी मारला आहे. काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या चौकशीची मागणी ‘सीबीआय’कडे अर्जाद्वारे केली आहे. १७ फेब्रुवारी रोजी शहा यांनी जाहीरसभेत मेघालय सरकार सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचा दावा केला होता. त्यांच्याकडे भ्रष्टाचारासंदर्भात माहिती असू शकेल. त्यामुळे शहांना ‘सीबीआय’ने चौकशीसाठी बोलवावे, असे पत्रात नमूद केले आहे.