दिल्लीत आम आदमी पक्षाचे (आप) सरकार सत्तेत येण्याच्या पार्श्वभूमीवर भांडवली बाजार कोसळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, मुंबई शेअर बाजाराने मंगळवारी हे अंदाज चुकवत तब्बल २०० अंकांची उसळी घेतली. तर, निफ्टीही ६८ अंकांनी वधारत ८५९५ वर जाऊन पोहचला. सेन्सेक्स आणि निफ्टीच्या या आश्चर्यजनक वाटचालीमुळे गुंतवणूकदारही काहीशा संभ्रमात पडले आहेत.
मंगळवारी दिल्ली विधानसभा निवडणुकांचे जाहीर झाल्यानंतर आप दिल्लीत एकहाती सत्ता स्थापन करणार हे जवळपास स्पष्ट झाले. त्यामागोमाग भाजपला १० जागांवर यश मिळण्याची चिन्हे आहेत.
यापूर्वी सोमवारी केंद्रातील सत्ताधारी भाजपाला नवी दिल्लीसाठीच्या निवडणूक अंदाजात अपेक्षेप्रमाणे स्थान न मिळालेले पाहून भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांनी नाराजी व्यक्त केली होती. आठवडय़ाच्या पहिल्याच सत्रात सेन्सेक्समध्ये ५०० अंशांची आपटी आणत मुंबई निर्देशांकाला त्याच्या गेल्या तीन आठवडय़ाच्या तळात नेऊन ठेवले होते. सलग सातव्या व्यवहारातील आपटीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ८,५५० पासून ढळला. त्यामुळे मंगळवारीही बाजारात मोठी घसरण पाहायला मिळेल, असा तज्ज्ञांचा अंदाज होता.