भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये मैत्रीपूर्ण चर्चा सुरू होण्यासाठी पाकिस्तानने अनेक वादग्रस्त घटनांबद्दल आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे, असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी, उभयपक्षीय संबंधांमध्ये तणाव असल्याचेही त्यांनी मान्य केले. भारतीय जवानांच्या निर्घृण शिरच्छेदाचे प्रकरण असो किंवा सरबजित सिंग याच्यावर तुरुंगामध्ये झालेल्या हल्ल्याचे प्रकरण असो, अशा घटनांमुळे पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल एकूणच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आणि जर, आता पुन्हा एकदा शांततामय चर्चेस सुरुवात व्हावी अशी पाकिस्तानची अपेक्षा असेल, तर त्यांनी भारताच्या काही प्रश्नांबाबत ठाम भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे, असे खुर्शीद यांनी स्पष्ट केले.
कोणतीही शांततामय चर्चा ही विश्वासाच्या पायावर आधारलेली असते. शिवाय अशा चर्चामध्ये लवकर सुटू शकणाऱ्या प्रश्नांचा समावेश असतो, असे खुर्शीद यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांच्या काही घोषणांचे त्यांनी स्वागत केले. मुंबई हल्ला प्रकरणाचा खटला वेगाने पुढे चालवणे, पाकिस्तानच्या भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी होणार नाही याची काळजी घेणे आणि भारतासह शांततामय नाते प्रस्थापित करणे अशा तीन मुद्दय़ांना प्राधान्य देण्याचा मानस नवाझ शरीफ यांनी जाहीर केला होता, त्याचे आपण स्वागत करीत आहोत, असे खुर्शीद यांनी नमूद केले.