सौर उर्जा घोटाळ्यातील प्रमुख आरोपीचा दावा; संबंधित महिलेने आरोप फेटाळले

केरळमधील सौर ऊर्जा घोटाळ्यात बुधवारी मुख्यमंत्री ओम्मन चंडी यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाला निराळीच कलाटणी मिळाली आहे. ओम्मन चंडी यांना आपण ५.५ कोटी रुपयांची लाच दिली असल्याचे या प्रकरणातील एका प्रमुख आरोपीने न्यायिक आयोगासमोर सांगितले. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री, त्यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री, काँग्रेसचा एक आमदार आणि अन्य एक नेता आणि मंत्र्यांच्या खासगी सचिवांचे या प्रकरणातील अन्य मुख्य आरोपीशी लैंगिक संबंध असल्याचा दावा प्रमुख आरोपीने न्यायिक आयोगापुढे केल्याने खळबळ माजली आहे.
या प्रकरणातील प्रमुख आरोपीचे नाव बी. राधाकृष्णन असे असून त्याने आरोपांचे पुरावे असल्याचा दावाही केला आहे. चंडी, ए. पी. अनिलकुमार आणि शिबू जॉन हे मंत्री, काँग्रेसचे आमदार हैबी एडन, काँग्रेसचे नेते आर्यदन शौकत आणि अनिलकुमार यांचे खासगी सचिव नझीरुल्ला यांचे या महिलेशी लैंगिक संबंध होते, असे राधाकृष्णन याने सांगितल्याने खळबळ माजली आहे.
राधाकृष्णन आणि त्या महिलेला २०१३ मध्ये अटक करण्यात आली . सौर ऊर्जा प्रकल्पासाठी या दोघांनी गुंतवणूकदारांकडून कोटय़वधी रुपये गोळा केले होते आणि ते बुडविल्याबद्दल या दोघांना अटक करण्यात आली. चंडी यांचे तत्कालीन खासगी सुरक्षा रक्षक सलीम राज यांच्या सूचनेवरून आपण स्वत: चंडी यांना ५.१ कोटी रुपये दिले, असा आरोप राधाकृष्णन याने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश जी. शिवराजन यांच्या एकसदस्यीय आयोगापुढे केला. राधाकृष्णन याच्या पत्नीची २००६ मध्ये हत्या करण्यात आली त्याप्रकरणी राधाकृष्णन जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे .
पलक्कडमधील सरकारी मालकीच्या औद्योगिक क्षेत्रातील ७० एकर जमीन देण्याचे चंडी यांनी मान्य केले होते आणि त्यासाठी सर्व लाभातील ४० टक्के वाटा मिळावा असे आश्वासनही घेतले होते, असा आरोपही राधाकृष्णन याने केला.
दरम्यान, या आरोपांना संबंधित महिलेने आव्हान दिले आहे. चंडी हे आपल्याला वडिलांप्रमाणे आहेत, त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करणे अनुचित आहे. आपण राधाकृष्णनविारुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही तिने स्पष्ट केले. आयोगासमोर ७ डिसेंबर रोजी म्हणणे मांडणार असून त्यावेळी सौर ऊर्जा घोटाळ्यातील सर्व आर्थिक व्यवहार उघड करणार असल्याचे सांगितले. शौकत यांना आपण पाहिलेलेही नाही, मात्र शिबू जॉन यांना ओळखते, हे मान्य केले.

चंडी यांच्याकडून खंडन
केरळमधील सौरऊर्जा घोटाळ्यातील आरोपी बी. राधाकृष्णन यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे केरळचे मुख्यमंत्री ओम्मन चंडी यांनी म्हटले आहे. आपल्याविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांमध्ये एक टक्का जरी सत्य आढळले तर आपल्याला सार्वजनिक जीवनात अथवा कोणत्याही पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे चंडी यांनी विधानसभेत स्पष्ट केले.तथापि, माकपच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी गुरुवारी चंडी यांना लक्ष्य केले आणि आरोपांच्या चौकशीची मागणी केली.