Bihar Election 2025 : बिहार विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून आतापासून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. बिहार विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजपा युतीने तर अनेक मोठ्या घोषणा देखील केल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेस आणि आरजेडी पक्षही नागरिकांना अनेक आश्वासन देत आहेत. असं असतानाच आता बिहार विधानसभा निवडणुकीच्या राजकीय मैदानात शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे उतरणार आहेत.

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली आहे. या अनुषंगाने ते लवकरच बिहारमध्ये गोरक्षा संकल्प यात्रा सुरू करणार आहेत. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी शनिवारी जाहीर केलं की ते बिहार विधानसभा निवडणुकीत गोहत्येविरुद्ध काम करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या अपक्ष उमेदवारांनाही पाठिंबा देतील. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती काय म्हणाले?

“सात दशकं आणि अनेक आश्वासनांनंतरही कोणताही पक्ष गोहत्येविरुद्ध कारवाई करण्याचं वचन देत नाहीये. बिहार निवडणुकीत आम्ही गोरक्षण आणि सनातन धर्मासाठी मतदान करणार आहोत. तसेच बिहार विधानसभा निवडणुकीत आम्ही अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देऊ. तसेच निवडणुकीत २४३ जागांवर उमेदवार उभे करू. पण त्यांची नावं आता आम्ही उघड करणार नाहीत.”

गोरक्षा संकल्प यात्रा सुरू करण्याची घोषणा

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी बिहारमध्ये गोरक्षा संकल्प यात्रा सुरू करण्याची घोषणा केली. तसेच आम्ही सर्व २४३ जागांवर गोरक्षणासाठी काम करणाऱ्या अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणार असून त्यांच्याबरोबर माझे आशीर्वाद असतील. आम्ही प्रत्येक मतदारसंघात किमान एक उमेदवार उभा करू. जो गोरक्षणासाठी समर्पित असेल, असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलं.

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी पुढे म्हटलं की, “आम्ही एकामागून एक पक्ष सत्तेत आणला. परंतु या दिशेने कोणतंही पाऊल उचललं जात नाही. आम्ही मतदारांना आता अशा उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन करू जे गोहत्या पाप मानतात आणि या देशातील हिंदूंच्या व्यापक भावनांशी सुसंगत राहून त्यांच्या संरक्षणासाठी काम करतात. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सांगतात की त्यांचा पक्ष गोरक्षणासाठी काम करतो आणि दुसरीकडे देशात गोमांसाची निर्यात वाढत आहे. हे खूप धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे आहे”, असंही त्यांनी म्हटलं.