दिवसेंदिवस कांद्याचे भाव वाढत असतानाच केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यास जागतिक बाजारात भारताच्या प्रतिमेवर परिणाम होईल, असे पवार यांनी बुधवारी स्पष्ट केले.
महाराष्ट्रासह कांद्याचे उत्पादन घेणाऱया राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे त्याची आवक घटली आहे. त्यामुळेच किरकोळ बाजारात कांद्याचे भाव वाढले आहेत. ही भाववाढ तात्पुरती आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, कोणत्याही शेती उत्पादनाच्या निर्यातीवर बंदी घालणे योग्य नाही. जागतिक बाजारात शेती उत्पादनांचा निर्यातदार देश म्हणून भारताने आपले स्थान निर्माण केले आहे. या स्थितीत जर आपण निर्यातीवर बंदी घातली, तर त्याचा भारताच्या प्रतिमेवर परिणाम होईल. त्यामुळेच कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालावी, असे मला वाटत नाही.
देशाच्या शेती उत्पादनांची निर्यात गेल्या आर्थिक वर्षात २.३३ लाख कोटींवर गेली आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षामध्ये ती १.८६ लाख कोटी होती, असेही पवार यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jul 2013 रोजी प्रकाशित
भाववाढ तात्पुरती; कांद्याच्या निर्यातीवर बंदी नको – शरद पवार
दिवसेंदिवस कांद्याचे भाव वाढत असतानाच केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.

First published on: 24-07-2013 at 12:55 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar not in favour of onion export ban