संरक्षण मंत्री असताना चीन दौऱ्यावर गेलो होतो तेव्हाच चीन भारताला धोकादायक ठरु शकतो असा अंदाज आपल्याला आला होता, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. १९९३ साली चीन दौऱ्यामध्ये सहज समुद्रकिनाऱ्यावर फिरताना चीनच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांबरोबर झालेल्या अनौपचारिक गप्पांची आठवण सांगत चीन धोकादायक ठरण्याची शक्यता या गप्पांदरम्यानच समजल्याचे पवारांनी सांगितलं. पवारांच्या ‘एक शरद सगळे गारद’ या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली, या मुलाखतीत शरद पवार यांनी चीनचे दोन ते अडीच दशकांपूर्वीच्या धोरणासंदर्भातील अनुभव सांगितले.

तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री होता. त्यावेळी तुम्ही अनेकदा चीनच्या दोऱ्यावर गेल्या आहात. त्यावेळी तुमचं मत काय होतं असा प्रश्न राऊत यांनी विचारला असता शरद पवार यांनी संरक्षण मंत्री असतानाची एक आठवण या मुलाखतीमध्ये सांगितली. “मी संरक्षण मंत्री असताना माझं ठाम मत होतं की आपल्याला खरी चिंता पाकिस्तानची नाही तर चीनची करायची गरज आहे,” असं पवार म्हणाले. याचसंदर्भातील एक उदाहरणही त्यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> चीन प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवारांचा मोदी सरकारला सल्ला, म्हणाले…

“मी १९९३ साली संरक्षण मंत्री म्हणून चीनला गेलो होतो. त्यावेळी माझ्याबरोबर तेव्हाचे संरक्षण सचिव वोहरा सुद्धा होते. मी आणि चीनच्या संरक्षण मंत्र्यांनी सात दिवस चर्चा केली. त्यावेळी हिमालयाच्या सीमेजवळ आपलं सैन्य होतं आणि त्याचंही सैन्य होतं. हिमालयन बॉर्डरवर सैनिक ठेवणं हे अतिशय खर्चिक होतं तसेच हवामानाच्या दृष्टीनेही बर्फ वगैरे असल्याने आपल्या जवानांसाठी अतिशय त्रासदायकं होतं. त्यामुळे त्या सात दिवसांच्या चर्चेमध्ये दोघांनाही आपलं सैन्य माघं घाययचं यावर एकमत केलं. त्याच आधारावर आम्ही कराराचा मसूदा तयार केला. मी तो तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडे पाठवला. तर चीनच्या संरक्षण मंत्र्यांनी हा मसूदा चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दाखवायचा आहे तर तुम्ही माझ्याबरोबर चला असं मला सांगितलं. कुठे काय याबद्दल माहिती न देता राष्ट्राध्यक्ष विश्रांतीला कुठे गेले आहेत तिकडे आपण जाऊ एवढं सांगून उद्या सात वाजता तयार राहा असं मला सांगण्यात आलं. संरक्षण खात्याच्या विमानातून आम्ही गेलो. तीन तासांनंतर ते विमान उतरलं. एका सागरी किनाऱ्याजवळचं ते शहर होतं. अजिबात लोकसंख्या नाही. जिथं ते उतरलं तिथं फक्त चांगले बंगले होते. कुठे आलो आहे असं विचारलं असता कम्युनिस्ट पार्टीच्या परदेश धोरणांसंदर्भातील सदस्यांच्या विश्रांतीसाठी हा परिसर आहे. इथं कोणी लोकसंख्या नाही हा सागरी किनारा आहे. त्यांचे त्यावेळेचे राष्ट्राध्यक्ष ली पांग तिथे विश्रांतीसाठी गेले होते. ठरल्याप्रमाणे आमच्यामध्ये झालेल्या चर्चेवर आधारित मसुदा त्यांना दाखवला. ठरलेल्याप्रमाणे अकरा साडेअकरा वाजेपर्यंत ही सगळी चर्चा संपली. नंतर त्यांनी एक वाजता आम्हाला जेवायला बोलवलं. जेवणं तिथेच होतं, तसचं हे शहरच नसल्याने कुठं जायलाही जागा नव्हती. मग उरलेल्या एक दीड तासात काय करायचं असा प्रश्न होता,” असं पवार आपल्या भेटीतील आठवणींसंदर्भात बोलताना म्हणाला.

नक्की वाचा >> शरद पवार म्हणतात, “पाकिस्तान नाही चीनच भारताचा सर्वात मोठा शत्रू, कारण…”

“काय करायचं असा प्रश्न पडलेला असतानाच ली पांग मला म्हणाले की लेट्स वॉक. म्हणजेच समुद्रकिनाऱ्यावरुन आपण चालूयात. ही सुवर्णसंधी समजून या निमित्तानं त्यांच्याशी बोलता येईल असा विचार करुन मी होकार दिला. मग आम्ही त्या किनाऱ्यावर चालू लागलो. तास सव्वा तास आम्ही चालत होतो. मी अनेक प्रश्न त्यांना विचारत होतो. तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की मला एकच गोष्ट सांगायची आहे की माझं टार्गेट अमेरिका आणि जपान आहे. मला चीनला आर्थिक क्षेत्रातील महासत्ता बनवायची आहे. अमेरिकेच्या तोडीस तोड चीन उभा राहू शकतो हे चित्र जगायला दाखवायचं आहे अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली. अमेरिकेच्यानंतर किंवा त्यांच्याबरोबरीने किंवा त्यांच्या अधिक पुढे गेलेला देश म्हणून मला चीनला समोर आणायचं आहे, असं मला सांगितलं,” अशी आठवण पवारांनी सांगितली.

“तुमचं शेजारच्या देशांबद्दल काय धोरण आहे असा प्रश्न मी त्यांना विचारला. ते हसले आणि म्हणाले आमचं टार्गेट ते आहे. शेजारच्या लोकांचा आम्ही आता विचार करत नाहीय. बघू त्यांच्याबद्दल पाच-पंचवीस वर्षांनी विचार करु, असं उत्तर मला त्यांनी दिलं,” अशी आठवण सांगत पवारांनी चीनचे धोरण तेव्हापासून ठरल्याचं स्पष्ट केलं. “ते उत्तर ऐकून माझ्या डोक्यात आलं की उद्या भारतासमोर संकट आलं तर ते आज नाही २५-३० वर्षांनी येईल. आता चीन आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला आहे आणि आता त्यांच लक्ष्य भारत आहे,” असंही पुढे बोलताना पवार म्हणाले.

नक्की वाचा >> चीन प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवारांचा मोदी सरकारला सल्ला, म्हणाले…

गळाभेट घेऊन काही होत नाही…

चीनची ताकद पाहता पाकिस्तानपेक्षा भारतासाठी चीनच अधिक अडचणी निर्माण करु शकतो असं पवार म्हणाले. त्याचबरोबर दोन्ही देशांमध्ये सर्व काही व्यवस्थित सुरु आहे हे दाखवण्यासाठी मोदी सरकारने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भारत दौऱ्यावर बोलवून केलेल्या प्रयत्नांनी प्रश्न सुटणार नसल्याचा टोलाही पवारांनी लगावला. “सारखे कपडे शिवून, झोपाळ्यावर बसणं, गळाभेट घेणं ठीक आहे, शेक हॅण्ड करणं ठिक आहे पण त्याने प्रश्न सुटत नसतात,” अशा शब्दांमध्ये पवारांनी शी जिनपिंग भेटीवरुन मोदी सरकारला टोला लगावला .