Shashi Tharoor on Donald Trump 50 per cent Tariffs on India : रशियाकडून तेल खरेदी करत असल्याबद्दल दंड म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादले आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांनी गुरूवारी अमेरिकेने भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयातशुल्क लावण्यावरून टीका केली आहे. तसेच त्यांनी अमेरिकेला जशास तसे उत्तर दिले जावे आणि भारताने देखील अमेरिकेवर ५० टक्के व्यापार शुल्क लादावे असे म्हटले आहे.

थरूर नेमकं काय म्हणाले?

“आपण देखील अमेरिकन मालावर ५० टक्के आयातशुल्क लादले पाहिजे,” असे शशी थरूर म्हणाले. पुढे बोलताना थरूर म्हणाले की, “मला वाटते की, अमेरिकन वस्तूंवर सरासरी भारताकडून लावला जाणारा कर १७ टक्के आहे, म्हणून जर ते ५० टक्के कर लादत असतील तर प्रत्युत्तर म्हणून आपण तरी १७ वर का थांबावे? आपणही तो ५० (टक्के) पर्यंत वाढवले पाहिजे.”

अमेरिकेने लादलेल्या ५० टक्के टॅरिफच्या संभाव्य परिणामाबद्दल बोलताना थरूर म्हणाले की, “याचा परिणाम होईल कारण आपला व्यापार ९० अब्ज डॉलर्सचा आहे. जर वस्तू ५० टक्क्यांनी महाग झाल्या तर लोक त्या विकत घेण्याआधी विचार करतील. जर व्हियचनाम, इंडोनेशिया, पाकिस्तान, बांगलादेश, चीन हे आपले स्पर्धक कमी किमतीत माल विकतील… तर त्याचा परिणाम होईल.”

थरूर यांनी भारतावर ५० टक्के शुल्क लादण्याच्या निर्णयावर देखील प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, की यामागे अमेरिकेचा काहितरी ‘छुपा संदेश’ आहे.”रशियाकडून तेल आणि पेट्रोलियम पदार्थ विकत घेतल्याचे कारणामुळे २५ टक्के अतिरिक्त शुल्क वाढवण्यात आले आहे, दुसरीकडे चीन हा जवळपास दुप्पट खरेदी करत आहे… आणि त्यांना ९० दिवस देण्यात आले आहेत, तर भारताला फक्त तीन आठवडे देण्यात आले आहेत. यामुध्ये वॉशिंटनचा काहीतरी छुपा संदेश असल्याचे दिसून येते. सरकारने काळजीपूर्वक परिस्थिती लक्षात घेऊन उत्तर दिले पाहिजे.”

भारत रशियाकडून तेल खरेदी करून एका अर्थी युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धाला मदत करतो, असा आरोप करत २४ तासांत भारतावर भरमसाठ आयातशुल्क लादण्याची धमकी ट्रम्प यांनी मंगळवारी दिली होती. ही धमकी खरी करून दाखवत त्यांनी बुधवारी अतिरिक्त कराच्या आदेशावर स्वाक्षरी केली.

अमेरिकेने लादलेल्या शुल्क वाढीच्या आदेशानुसार, काही वस्तू व सेवा वगळता भारतीय मालावर ५० टक्के शुल्क लादले जाईल. आधी जाहीर केलेल्या २५ टक्के शुल्काची अंमलबजावणी आज, गुरुवारपासून होणार आहे. तर बुधवारपासून २१ दिवसांनी अतिरिक्त २५ टक्के शुल्क लागू केले जाईल. अतिरिक्त शुल्क लागू होण्यापूर्वी भारतातून अमेरिकेकडे निघालेल्या आणि १७ सप्टेंबरला रात्री १२.०१ वाजेपर्यंत विक्रीसाठी गोदामाबाहेर काढण्यात आलेल्या मालावर हे अतिरिक्त शुल्क लागू नसेल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ट्रम्प यांनी केलेल्या अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्काच्या घोषणेनंतर भारताने अमेरिकेला ठणकावलं आहे. अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी, अवास्तव आणि अन्यायकारक असल्याचं भारताने म्हटलं आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर पोस्ट करत याबाद्दल भूमिका स्पष्ट केली आहे., “इतर अनेक देशांनी स्वतःच्या राष्ट्रीय हितासाठी केलेल्या कृतींसाठी अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेतला हे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही पुन्हा सांगतो की ही कृती अन्यायकारक आणि अवास्तव आहे. भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलेल”, असे ते म्हणाले आहेत.