Shashi Tharoor : भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षानंतर आता शस्त्रविराम झाला आहे. तरीही पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास जशास तसं उत्तर देऊ असं भारताने स्पष्ट केलं आहे. दरम्यान आज काँग्रेस पक्षाकडून इंदिरा गांधी होणं सोपं नाही म्हणत १९७१ मध्ये इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे कसे केले होते? याच्या आठवणी जागवण्यात आल्या. या सगळ्याबाबत आता काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनीही भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले शशी थरुर?

“१९७१ ची परिस्थिती वेगळी होती आणि २०२५ ची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. सद्यस्थितीत भारताने शांतता आणि स्थैर्य यावर लक्ष केंद्रीत करणं आवश्यक आहे. भारताने यावेळी दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी कारवाई केली. ही कारवाई आता झाली आहे. दहशतवाद्यांना उत्तर दिलं गेलं आहे. भारताने आता आर्थिक प्रगती आणि नागरिकांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. दीर्घ काळासाठी युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थितीत अडकून पडणं योग्य नसेल.” असं शशी थरुर म्हणाले आहेत.

१९७१ चं युद्ध हे बांगलादेशला स्वातंत्र्य मिळावं म्हणून लढलं गेलं-थरुर

शशी थरुर यांनी ही बाबही अधोरेखित केली की १९७१ मध्ये जे युद्ध झालं त्याचा आम्हाला आपल्याला सगळ्यांनाच अभिमान आहे. बांगलादेश स्वातंत्र्यासाठीच ते युद्ध झालं होतं. आजची परिस्थिती तशी नाही. पाकिस्तानची सैन्य स्थिती, तांत्रिक क्षमता आणि रणनीती सगळं काही बदललं आहे. भारताला फक्त सूड उगवायचा नाही तर भारताला स्थैर्य हवं आहे ही बाबही शशी थरुर यांनी ANI शी बोलताना नमूद केली.

भारताने पाकिस्तान नरमला शस्त्रविराम झाला म्हणून मोदी सरकारचं कौतुक होत असतानाच दुसरीकडे दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या १९७१ च्या आठवणी जागवल्या जात आहेत. इंदिरा गांधी होणं सोपं नाही असं म्हणत काँग्रेसकडून इंदिरा गांधीचे जुने व्हिडिओ व फोटो शेअर केले जात आहेत. काँग्रेस नेते मोठ्या प्रमाणावर हे फोटो पोस्ट करत आहेत. इंदिरा गांधी हा हॅशटॅगही ट्वीटरवर ट्रेंड आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंदिरा गांधींनी केले होते पाकिस्तानचे दोन तुकडे

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १८७१ मध्ये त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. ज्यानंतर बांग्लादेशची निर्मिती झाली. या ऐतिहासिक घटनेच्या शिल्पकार म्हणून इंदिरा गांधींना ओळखलं जातं. तसंच पाकिस्तानला लक्षात राहिल असा धडा त्यांनी शिकवला असंही अनेकांनी म्हटलं होतं. आज पुन्हा एकदा त्या आठवणींना काँग्रेसकडून उजाळा दिला जातो आहे. दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारच्या नेतृत्वात गेल्या ७ मेपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीला अखेर विराम मिळाला आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून आलेल्या फोन कॉलनंतर भारताने याबाबतची घोषणा केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सैन्य दलाच्या कारवाई थांबल्याची घोषणा होताच, काँग्रेसकडून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. इंदिरा गांधींनी १९७१ च्या युद्धावेळी घेतलेल्या कणखर भूमिकेची आठवण करुन दिली जात आहे. काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी ट्विट करत इंदिरा होना आसान नही असंही अनेकांनी म्हटलं आहे. यावर आता भाजपाकडून काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आता शशी थरुर यांनी या बाबत वेगळी भूमिका घेतल्याचं दिसून येतं आहे.