Indian Delegation in US slams Pakistan over Cross Border Terrorism : पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी, त्यांचा दहशतवादी अजेंडा जगासमोर आणण्यासठी भारतीय खासदार व अधिकाऱ्यांची शिष्टमंडळं जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर गेली आहेत. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलं आहे. यावेळी शशी थरूर म्हणाले, “पाकिस्तान सातत्याने भारतविरोधी कुरापती करतोय, भारतात दहशदवादी हल्ले घडवून आणतोय. मात्र, आता त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. कारण, इस्लामाबाद दहशतवादाशी लढण्याबाबत गांभीर्य दाखवत नाहीये”.

शशी थरूर यांनी न्यूयॉर्कमधील भारताच्या वाणिज्य दूतावासात अमेरिकेतील थिंक टँक व प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी पाकिस्तानचा निषेध नोंदवला. ते म्हणाले, “पाकिस्तान भारताची जमीन बळकावण्यासाठी सातत्याने दहशतवादाचा वापर करत आला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचं प्रमुख उद्दीष्ट म्हणजे जम्मू-काश्मीरची शांतता बिघडवणे, तिथे तणाव निर्माण करणे आणि भारतात हिंसाचार करणे हे होतं. त्या दहशतवाद्यांनी हिंदू नागरिकांना गोळ्या घातल्या.

केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदार व माजी सनदी अधिकाऱ्यांची सात शिष्टमंडळं तयार केली असून जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवण्यात आली आहेत. थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ हे त्यापैकीच एक आहे. या शिष्टमंडळाने भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर” या मोहिमेची न्यूयॉर्कमध्ये माहिती दिली. दहशतवादाला तोंड देताना अशा प्रकारची मोहीम किती महत्त्वाची आहे हे या शिष्टमंडळाने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी आम्ही आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली : थरूर

काँग्रेस खासदार शशी थरूर यावेळी म्हणाले, “पाकिस्तानात बसलेला कोणीही भारतीय नागरिकांवर हल्ला करू शकत नाही. त्यांनी तसं केल्यास त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी यापूर्वी पूलवामा येथे हल्ला केला. त्यानंतर भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक करून त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तिथल्या दहशतवादी छावण्या उद्ध्वस्त केल्या. यावेळी (ऑपरेशन सिंदूर) भारताने केवळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषाच नव्हे तर आंतरराष्ट्रीय सेमा देखील ओलांडली आणि पाकिस्तानमध्ये त्यांच्या घरात घुसून हल्ला केला. आम्ही केवळ दहशतवाद्यांना लक्ष्य केलं. आम्हाला पाकिस्तानबरोबर युद्ध करणात काडीमात्र रस नाही. आम्ही केवळ दहशतवादाशी दोन हात करत आहोत.