Shashi Tharoor urges caution over Donald Trump new tone On US-India ties : गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये टॅरिफच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला आहे. मात्र दोन्ही देशांदरम्यान विशेष संबंध असून वादाचे असे क्षण उद्भवत असतात त्यावरून चिंता करण्याचे कारण नाही, असे मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी व्यक्त केले. इतकेच नाही तर ट्रम्प यांनी मोदींची कौतुक करत ते महान पंतप्रधान असून ते आपले सदैव मित्र राहतील असेही वक्तव्य केले.यावर पंतप्रधान मोदी यांनी देखील ट्रम्प यांचे मुल्यांकन सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया एक्सवर पोस्ट करत दिली होती.
यादरम्यान अमेरिका-भारत संबंधांबाबत ट्रम्प यांचा सूर अचानक बदलल्याने काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरून यांनी भारत सरकारला सावध केले आहे. त्यांनी ट्रम्प यांच्या बदललेल्या भूमिकेवर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्या विधानावर तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी, दोन्ही देशांच्या सरकारांकडून संबंध सुधारण्याकरिता गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचे शशी थरूर म्हणाले आहेत.
थरूर नेमकं काय म्हणाले?
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना थरूर म्हणाले की, “पंतप्रधान यांनी खूप लवकर प्रतिसाद दिला आणि परराष्ट्रमंत्र्यांनी देखील व्यापक जागतिक धोरणात्मक भागिदारी असलेल्या संबंधांचे महत्त्व आधोरेखित केलेय, जे अजूनही आहेत. आणि हा संदेश देणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.”
“मला असे वाटते की, दोन्ही बाजूंची सरकारे आणि राजनैतिक अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काही दुरुस्तीची कामे करणे आवश्यक आहे. मी या नवीन भूमिकेचे स्वागत सावधगिरीने करेन. हे इतक्या लवकर विसरता किंवा माफ करता येणार नाही, कारण भारतीयांना जमिनीवर याच्या परिणामांना सामोरे जावे लागत आहे आणि त्या परिणामांवर मात करणे आवश्यक आहे,” असेही ते पुढे म्हणाले.
पंतप्रधान मोदी हे चीनमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या वार्षिक परिषदेला हजर राहिले होते. त्यानंतर “भारत आणि रशिया हे देश चीनच्या अधिक जवळ गेल्याचे दिसत आहे,”असे ट्रम्प म्हणाले होते. पण अमेरिका भारताबरोबरचे संबंध पूर्ववत करायला तयार आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले होते की, “भारत आणि अमेरिकेचे संबंध विशेष आहेत. त्याबद्दल चिंता करायचे काहीच कारण नाही. आताही आमच्यात फक्त वाद निर्माण झाला आहे.” तसेच भारत रशियाकडून इतक्या प्रमाणात तेल खरेदी करत असल्याबद्दल आपण फार निराश झालो आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. तर मोदी यांनी देखील ट्रम्प यांच्या विधानाला प्रतिसाद दिला होता. “भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध अत्यंत सकारात्मक आहेत आणि सर्वंकष व जागतिक सामरिक भागीदारीकडे उत्सुकतेने पाहत आहोत,” असे मोदी यांनी नमूद केले.