बिहार निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर पक्षश्रेष्ठींवर हल्ला चढवून नितीश कुमार यांच्यावर स्तुतीसुमने उधळणारे भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे गोडवे गायला सुरूवात केली आहे. राहुल गांधी हे उगवता तारा असल्याचे शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे.

बिहारचा विजय हा लोकशाहीचा विजय आहे. लालू, नितीश आणि ‘उगवता तारा’ असलेले राहुल गांधी यांच्या सरकारला माझ्या शुभेच्छा, असे ट्विट शत्रुघ्न यांनी केले आहे.

नितीश,लालू आणि राहुल यांना बिहारमधील सत्ता स्थापनेच्या शुभेच्छा देतानाच सिन्हा हे भाजपला टोला लावायला विसरले नाहीत. नितीश कुमार यांच्या शपथविधीला केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू, राजीवप्रताप रुडी उपस्थित राहणार आहेत. याचा उल्लेख करून व्यंकय्या नायडू व इतर छोट्या नेत्यांना नितीश कुमार यांच्या शपथविधीला पाठविण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेचे मी स्वागत करतो, असे ट्विट सिन्हा यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा गेल्या अनेक दिवसांपासून पक्षश्रेष्ठींवर टीका केल्यामुळे चर्चेत आहेत. बिहारमधील भाजपच्या पराभवाच्या जबाबदारीवरून सिन्हा यांनी मोदी आणि शहा यांना टोला लगावला होता. तसेच पक्षश्रेष्ठींवर टीका केल्याने  कारवाईची शक्यता असल्याची चर्चा सुरू असतानाच सिन्हा यांनी माझ्यावर कारवाई करण्याची कोणाचीही हिम्मत नसल्याचे विधान केले होते.