Sheikh Hasina Asylum : बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. त्या लंडनमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. परंतु, ब्रिटनच्या स्थलांतर कायद्यानुसार देशात दाखल होण्यापूर्वी कुणाला तात्पुरता आसरा देता येत नाही, यामुळे त्यांचा लंडनला जाण्याचा मार्ग रखडला आहे. दरम्यान, याबाबत एनडीटीव्हीने शेख हसीना यांचा मुलगा साजीब वाझेद यांच्याशी संवाद साधला असून त्यांनी या वृत्ताला नकार दिला आहे. गेल्या २४ तासांपासून शेख हसीना भारतातच असून त्यांनी कोठेही आश्रय मागितला नसल्याचं ते म्हणाले आहेत.

वॉशिंग्टनमध्ये सजीब वाझेद म्हणाले की, आश्रयाबद्दल युकेचं असलेलं मौन आणि अमेरिकेने त्यांचा व्हिसा नाकारला असल्याचं वृत्त चुकीचं आहे. त्यांनी आश्रयासाठी कुठेही विनंती केलेली नाही. त्यामुळे अमेरिका आणि युकेच्या उत्तराची वाट पाहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

ही आईची शेवटची टर्म असणार होती

अमेरिकेचा व्हिसा रद्द करण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “अमेरिकेशी अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. माझ्या आईने बांगलादेशात बरीच वर्षे कार्य केलं आहे. त्यामुळे ती निवृत्तीच्या विचारात होती. ही तिची शेवटची टर्म असणार होती, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

हेही वाचा >> Awami League Leaders : धुडगूस, हिंसाचार अन् जाळपोळ; शेख हसीना यांनी पलायन केल्यानंतर अवामी लीगच्या नेत्यांची हत्या! हॉटेल, गच्ची, छतावर आढळले मृतदेह

आता कुटुंब एकत्र येणार

ते पुढे म्हणाले, “कुटुंब आता एकत्र वेळ घालवण्याची योजना आखत आहे. हा एकत्र वेळ कुठे आणि कसा यावर आम्ही विचार करू. मी वॉशिंग्टनमध्ये आहे, माझी मावशी लंडनमध्ये आहे, माझी बहीण दिल्लीत राहते, त्यामुळे आम्हाला माहित नाही, ती कदाचित या ठिकाणांदरम्यान प्रवास करेल”, असं ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकी काय चर्चा होती?

बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन हसीना हवाई दलाच्या विमानाने भारतात दाखल झाल्या. येथून त्या पुढे लंडनपर्यंत प्रवास करणार होत्या, असे वृत्त विविध माध्यमांनी दिले. मात्र आता या नियोजनात अडचणी निर्माण झाल्या आहेत. ब्रिटनच्या स्थलांतर कायद्यानुसार देशात दाखल होण्यापूर्वी कुणाला तात्पुरता आसरा देता येत नाही. एकदा ब्रिटनमध्ये आल्यानंतर असा आश्रय मागितला जाऊ शकतो. मात्र हसीना यांच्याकडे राजनैतिक पारपत्र किंवा अधिकृत व्हिसा नाही. त्यामुळे आधी व्हिसा मिळवून आणि नंतर लंडनला जाऊन त्यांना आश्रय मागावा लागेल. ही तांत्रिक अडचण सोडविण्याचा प्रयत्न लंडन आणि दिल्लीमधून केला जात असल्याचे समजते. मात्र सद्यास्थितीत त्या भारतात ‘सुरक्षित’ असून प्रश्न सुटत नाही तोपर्यंत त्यांना येथेच शरण देण्याची तयारी केंद्र सरकारने केल्याचेही समजते. यावरून सजीब वाझेद यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.