हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी होऊन जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिमाचलच्या सोलानमध्ये ढगफुटी झाल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला राजधानी शिमल्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. शिमल्याच्या उत्तर भागात दरड कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली २० जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी नऊ मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत. त्याचबरोबर शिमल्याचं उपनगर बालूगंजमध्ये एका मंदिरावर दरड कोसळली आहे. मंदिरातील २५ हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या भागात बचावकार्य सुरू असून पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे सोमवारी (१४ ऑगस्ट) सकाळी मोठी दुर्घटना घडली. येथील समरहिल परिसरात असलेल्या शिव बावडी मंदिर परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. यावेळी मंदिरही जमीनदोस्त झालं आहे. दरड कोसळली तेव्हा मदिरात २५ हून अधिक भाविक उपस्थित होते. त्यामुळे हे २५ जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. सकाळपासून बचाव पथकाडून बचाव मोहिम सुरू आहे. बचाव पथकाने आतापर्यंत २ लहान मुलांसह ५ मृतदेह बाहेर काढले आहेत. उर्वरित लोकांचा अद्याप शोध सुरू आहे.
हे मंदिर शिमल्याच्या उपनगरातील बालूगंज भागात आहे. आज श्रावणी सोमवार असल्यामुळे मंदिरात सकाळपासूनच गर्दी होती. अनेक भाविक दर्शनासाठी मंदिरात गेले होते. त्याचवेळी दरड कोसळून हे मंदिर जमीनदोस्त झालं. मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. डोंगरावरून अजूनही दगड खाली पडत आहेत. ढिगाऱ्यासह मंदिराच्या वर चार ते पाच झाडे उन्मळून पडली आहेत. एसडीआरएफ, आयटीबीपी, पोलीस आणि स्थानिक लोक बचावकार्यात गुंतले आहेत. जेसीबी मशीनच्या सहाय्याने डेब्रिज हटवण्याचं काम सुरू आहे.
हे ही वाचा >> हिमाचलमध्ये ढगफुटी, शिमल्यात दरड कोसळून ९ जणांचा मृत्यू, सोलानमध्ये ७ बळी
हिमाचलच्या सोलान जिल्ह्यातील कंडाघाट येथील जडोंन गावात ढगफुटीमुळे दोन घरं कोसळली असून त्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.