पीटीआय, कोची
केरळच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात सिंगापूरच्या मालवाहू जहाजाला सोमवारी आग लागली असून त्यावरील कर्मचाऱ्यांची सुटका केली जात असल्याची माहिती संरक्षण खात्याच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली. ‘एमव्ही वॅन हेय ५०३’ या मालवाहू जहाजावर एकूण २२ कर्मचारी होते. त्यापैकी १८ जणांनी जहाजातून सुटका करून घेतली. त्यांचा बचाव भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाकडून करण्यात आल्याचे संरक्षण खात्याने सांगितले.
जहाजाला लागलेली आग विझवण्यात अद्याप यश आले नसून ते समुद्रात तरंगत आहे. या जहाजावर काही धोकादायक पदार्थ असल्याची माहिती अझिकल बंदराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामध्ये स्फोटक घनपदार्थ, द्रवपदार्थ आणि घातक पदार्थांचा समावेश आहे. जहाजावरील २२ कर्मचाऱ्यांपैकी कोणीही भारतीय नसल्याचे सांगण्यात आले.
तटरक्षक दलाची साचेत, अर्णवेश, समुद्र प्रहारी, अभिनव, राजदूत आणि सी-१४४ ही जहाजे बचावकार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. आधी ‘एमव्ही वॅन हेय ५०३’वर स्फोट झाल्याचे वृत्त होते, मात्र नंतर ती आग लागली असल्याचे स्पष्ट झाले. या आगीची माहिती सर्वात आधी मुंबईतील मारिटाइम ऑपरेशन्स सेंटरकडून कोचीमधील सकाळी १०.३०च्या सुमाराला केंद्राला देण्यात आली.
संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २७० मीटर लांबीचे ‘एमव्ही वॅन हेय ५०३’ हे जहाज ७ जूनला कोलंबोहून निघाले होते आणि १० जूनला मुंबईला पोहोचणार होते.