छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. गडकिल्ल्यांपासून सोशल नेटवर्किंगपर्यंत सगळीकडेच शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे. मात्र हा शिवजन्मोत्सव सोहळा केवळ राज्य किंवा देशापुरता मर्यादित राहिला नसून जगभरातील भारतीय मोठ्या उत्साहात शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी अमेरिकेमधील न्यूयॉर्क येथील वकिलातीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात डेप्युटी काऊन्सूल जनरल शत्रुघ्न सिन्हा, सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, सिनेट सदस्य केविन थॉमस उपस्थित होते. विशेष म्हणजे सर्वांनी फेटे बांधून भाषणे दिली. वकिलातीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी शेकडो भारतीयांनी उपस्थिती लावली होती.

सर्व मान्यवरांनी शिवाजी महाराजांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. सिनेट सदस्य थॉमस यांनी शिवजयंतीनिमित्त मला शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याची संधी मिळाली हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

राज्यसभा खासदार छात्रपती संभाजीराजांनी व्हिडीओ कॉन्फर्नसिंगच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधत सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमामध्ये शिवाजी महारांच्या आयुष्यातील प्रसंग दाखवणारे छोटे नाटुकलेही सादर करण्यात आले.

हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये झळकणारा अभिनेता रितेश देशमुख यानेही व्हिडीओ कॉन्फर्नसिंगच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधत शिवाजी महाराजांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

नागराज यांनीही उपस्थितांशी संवाद साधत त्यांना संबोधित केले.

यावेळी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराबरोबर सेल्फी काढण्याचा मोहही नागराज यांना आवरला नाही. त्यांनी सोशल मिडियावर हा सेल्फी शेअर केला आहे.

परदेशाबरोबरच आज राज्यभरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होताना दिसत आहे. दिल्लीमध्येही मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात शिवजयंती साजरी करण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv jayanti celebration at indian consulate in new york
First published on: 19-02-2019 at 14:19 IST