केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (सोमवारी) संसदेत काश्मीरच्या विषयावर निवेदन करताना जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याची शिफारस मांडली. यानंतर या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीदेखील ट्विट करत देशाच्या इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे.

आजचा दिवस देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस आहे. कलम 370 हटवल्यामुळे जम्मू काश्मीर आता खऱ्या अर्थाने भारताचा अविभाज्य भाग होईल. आता काश्मीर हे प्रगतशील आणि सुरक्षित राज्य म्हणून आता उभं राहिल, अशा आशयाचं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. तसेच हा अभिमानाच्या क्षण असून त्यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले. तसेच याच कारणामुळे आम्ही 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला पाठिंबा दिला होता, असेही ते म्हणाले.

जम्मू काश्मीर आणि लडाखच्या नव्या उभारणीचा फायदा तेथील नागरिकांनाच होणार आहे. यामुळे राज्यात शांतता प्रस्थापित होण्यास मदत मिळेल. तसेच राज्याची भरभराटही होईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केल्याचेही पहायला मिळाले.

जम्मू व काश्मीरमध्ये मंत्रिमंडळ असेल परंतु या कायद्याला केंद्रशासित राज्याचा दर्जा असेल तर लडाख हा मंत्रिमंडळ नसलेला केंद्रशासित प्रदेश असेल असा प्रस्ताव अमित शाह यांनी राज्य सभेत मांडला. यामुळे काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम रद्द करण्यात येणार आहे. या तरतुदीमुळे जम्मू व काश्मीर यांचा दर्जा अन्य राज्यांप्रमाणेच होणार आहे. काश्मीरच्या विषयावर आम्ही चार विधेयके मांडणार आहोत. आम्ही प्रत्येक विषयावर चर्चा करण्यास आणि प्रत्येक प्रश्नावर उत्तर देण्यास तयार आहोत असे अमित शाह म्हणाले. अमित शाह यांनी काश्मीरमध्ये लागू असलेले घटनेचे कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर राज्यसभेत एकच गदारोळ सुरु झाला. केंद्र सरकार कलम 35 अ मध्ये बदल करण्याच्या पर्यायांवर विचार करत आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.