शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज बुधवारी न्यायमूर्ती सूर्य कांत आणि एन. के. सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याआधी पक्षनाव आणि पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्याची विनंती ठाकरे गटाने यावेळी केली. लाईव्ह लॉने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

येत्या चार आठवड्यांच्या आत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी ही मागणी केली. पण न्यायालयीन सुट्ट्यांपूर्वी या प्रकरणाची सुनावणी करणे शक्य नसल्याचं न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी स्पष्ट केलं. त्यावर, सिब्बल यांनी विनंतीला जोर देऊन न्यायालयीन निकालाशिवाय हा निर्णय इतर कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसल्याचं म्हटलंय.

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडे एक चिन्ह आहे, त्यावर निवडणूक का लढवली जाऊ शकत नाही? असा प्रश्नही न्यायमूर्ती कांत यांनी विचारला. यावर सिब्बल म्हणाले की, “आमचे मूळ चिन्ह त्यांच्याकडे आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“निवडणुका सुरळीत होऊ द्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, बहुतेक मतदार चिन्हाला पाठिंबा देत नाहीत”, असे न्यायमूर्ती कांत म्हणाले. तसंच, जर ही याचिका इतकी महत्त्वाची असेल तर आम्ही सुट्ट्यांच्या यादीत याचा समावेश करू.