CJI Bhushan Gavai Shoe Hurled Case: भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न झाला होता. वकील राकेश किशोर यांनी भूषण गवईंच्या दिशेनं बूट भिरकावल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर रीतसर राकेश किशोर यांच्यावर कारवाईदेखील झाली. पण आता घटनेच्या जवळपास महिन्याभरानंतर गुजरातमधील एका मानवी हक्क संघटनेकडून या घटनेला उत्तर म्हणून एक अजब उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नवसर्जन असं या संघटनेचं नाव असून तब्बल ५००० बुटांचे जोड वाटण्याचा निर्णय या संघटनेकडून जाहीर करण्यात आला आहे.

येत्या २६ नोव्हेंबरपासून ६ डिसेंबरपर्यंत दलित समुदायातील गरजू विद्यार्थ्यांना हे बुटांचे जोड वाटण्यात येणार आहेत. गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश, चंदीगढ व राजस्थान या राज्यांमधील विद्यार्थ्यांना हे वाटप केलं जाईल. ज्यांना आरक्षणाचा लाभ झाला आहे, अशा समाजातील व्यक्तींनी पुढाकार घेऊन या बूट वाटपासाठी आर्थिक मदत करण्याचं नियोजन संघटनेकडून करण्यात आलं आहे. यासाठी नवसर्जन संघटनेसोबतच दलित शक्ती केंद्र व दलित फाउंडेशन या इतर संस्थाही या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत.

CJI गवई आणि संस्थेचं उद्दिष्ट!

नवसर्जन संस्थेचे संस्थापक मार्टिन मकवान यांनी या उपक्रमामागचा हेतू सांगताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्याच्या घटनेचा उल्लेख केला. “आम्ही या उपक्रमाला देणगी देण्यासाठी अशाच लोकांना संपर्क करतोय, ज्यांना आरक्षणाचा लाभ झाला आहे. ही त्यांची सामाजिक जबाबदारी असल्याचं आम्ही त्यांना सांगत आहोत. आम्हाला असं वाटतंय की ज्यांना आरक्षणाचा लाभ झालाय, त्यांच्यापैकी बहुतेकजण समाजापासून लांब गेले आहेत. त्यामुळेच समाजाचं संघटन कमकुवत होऊ लागलं आहे. सरन्यायाधीश भूषण गवईंवरील बूट फेक प्रकरणात हेच दिसून आलं”, असं मकवान इंडियन एक्स्प्रेसला म्हणाले.

“सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबाबतीत जे घडलं, ती खरंतर मोठी घटना होती. पण त्याचा कोणताही मोठा परिणाम दिसून आला नाही. त्यामुळे आम्ही विचार केला की या घटनेला उत्तर म्हणून सर्वात उत्तम उपक्रम आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या समाजघटकांकडून सामाजिक बांधिलकी म्हणून गरीब कुटुंबातील मुलांना बूट जोड देण्याचा पर्याय योग्य राहील”, असंही मकवान यांनी नमूद केलं.

बुटांचीच निवड का केली?

दरम्यान, उपक्रमासाठी बुटांचीच निवड का केली? यामागचं कारणही मकवान यांनी सरन्यायाधीशांबाबत घडलेल्या प्रसंगाचं दिलं. “आम्ही या उपक्रमासाठी बुटांचीच निवड केली कारण त्या संपूर्ण घटनेच्या केंद्रस्थानी बूटच होते”, असं ते म्हणाले.

कसा पार पाडला जाणार हा उपक्रम?

“स्वयंसेवक निवडलेल्या गावांमध्ये जाऊन चौकशी करतील की कुणाकुणाला आरक्षणाचा फायदा झाला. अशा कुटुंबांकडून एका जोडी बुटांसाठी किमान २०० रुपयांच्या देणगीची मागणी केली जाईल. इयत्ता ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांना हे बूट दिले जाणार आहेत. आधी आम्ही १००० बुटांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण आम्हाला लोकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आम्ही संख्या वाढवली. आत्तापर्यंत आम्हाला २००० बुट जोड्यांसाठी देणग्या मिळाल्या आहेत”, अशी माहितीही मकवान यांनी दिली.