लोकसभेसाठी श्रीनगर मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत नॅशनल काँफरंसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला विजयी ठरले आहेत. पीडीपीचे उमेदवार नाजीर अहमद खान यांचा त्यांनी पराभव केला. अब्दुल्ला दहा हजार मताधिक्याने निवडून आले आहेत. निवडून आल्यानंतर त्यांनी राज्यातील पीडीपी भाजप सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या निवडणुकीत केवळ साडे सात टक्के मतदान झाले होते. तर काही ठिकाणी फेरमतदान घेण्यात आले होते. ९  (रविवार) आणि १३ (गुरुवार) एप्रिल या दिवशी या मतदान झाले होते. रविवारी झालेल्या हिंसाचारामुळे काही ठिकाणी पुन्हा मतदान करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. काश्मीरमधील बुडगाम या भागात मतदानादरम्यान सर्वाधिक हिंसाचार झाला होता.

१३ एप्रिल रोजी काही ठिकाणी फेरमतदान घेण्यात आले होते. या दिवशी खूप कमी मतदान झाले होते. ३४,१६९ अधिकृत मतदात्यांपैकी केवळ ३४४ मतदारांना दुपारपर्यंत हजेरी लावली होती. त्या आधी रविवारी मतदान झाले होते. त्या दिवशी सातच टक्के मतदान झाले होते. तर मतदान करण्यासाठी जाणाऱ्या लोकांवर दगडफेक झाली त्यामुळे मतदानाला अल्पसा प्रतिसाद मिळाला होता. आंदोलक आणि लष्करामध्ये झालेल्या संघर्षात आठ जण मृत्यूमुखी पडले होते. रविवारी १२.६१ लाख मतदात्यांपैकी केवळ ७.१४ टक्क्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीसाठी एकूण ९ जण उभे होते. नॅशनल काँफरंस पक्षाचे फारूख अब्दुल्ला, पीपल डेमोक्रेटिक पक्षाचे नाजीर अहमद खान हे रिंगणात होते. पीडीपी नेते तारिक हमीद यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिकामी झाली होती.

बुडगाम आणि खानसाहिब या विधानसभा मतदारसंघातून तर एकाही मतदाराने मतदान केले नाही. तर चरार ए शरीफ या भागातून केवळ दोन मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. रविवारी चादुरा या भागात सर्वाधिक हिंसाचार पाहायला मिळाला होता. या भागात आज २०० जणांनी मतदान केले आहे. बीरवाह या भागातून १४२ जणांनी मतदान केले होते. मतदानाला अल्पसा प्रतिसाद मिळाल्यामुळे केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी चिंता व्यक्त केली होती. काश्मीरमधील ही स्थिती विदारक असल्याचे ते म्हणाले होते. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही लवकरच कठोर पावले उचलू असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shrinagar bypoll election national conference farooq abdullah wins election
First published on: 15-04-2017 at 17:18 IST