फेब्रुवारीमध्ये अमेरिकेमध्ये एका बारमध्ये श्रीनिवास कुचिभोतला याच्यावर वर्णभेदातून हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला होत असताना तो थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या इयान ग्रिलोटचा भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांनी एक लाख डॉलर देऊन सत्कार केला. कन्सासमध्ये श्रीनिवास कुचिभोतला या ३२ वर्षीय तरुणाची वंशभेदातून हत्या करण्यात आली. श्रीनिवास आणि अलोक मदासानी हे दोघेजण एका बारमध्ये बसलेले होते. अमेरिकन नौदलातील माजी अधिकारी अॅडमने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या देशातून चालता हो असे म्हणत त्याने गोळीबार केला. श्रीनिवास याला वाचवण्यासाठी समोर आलेल्या इयान ग्रिलोटला देखील गंभीर जखम झाली होती.  श्रीनिवास आणि आलोकवर गोळीबार सुरू असताना अ‍ॅडमला अडवण्याची हिंमत दाखवणारा इयान ग्रिलोट हा २४ वर्षीय तरुण  समाजमाध्यमावर चर्चेचा विषय बनला होता. गोळीबारादरम्यान एका टेबलाखाली लपलेल्या इयानने अ‍ॅडमने गोळ्यांचा वर्षांव केल्यानंतर त्याला पाठीमागून पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र या झटापटीत अ‍ॅडमने त्याच्यावरही गोळी झाडली.

अ‍ॅडमने गोळ्या झाडल्या त्या वेळी आपण त्या मोजल्या. सहा गोळ्या त्याने झाडल्याने आता त्याच्या रिव्हॉल्व्हरमधील गोळ्या संपल्या असतील असा आपला हिशेब होता. मात्र तो चुकल्याने गोळी लागल्याचे इयानने सांगितले होते. मात्र केलेल्या कृत्याचा आपणास अभिमान आहे असे त्याने म्हटले. मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेल्या इयानच्या कृतीवर जगभरातून त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली जात आहेत. त्याच्या या शौर्याची दखल परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी देखील घेतली होती. धर्म आणि वंशाच्या आधारे होणाऱ्या भेदभावाला या देशात स्थान नाही असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. धर्म आणि वंशाच्या मुद्दावरुन होणाऱ्या हिंसा थांबाव्यात यासाठी ट्रम्प प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत असे ते म्हणाले.

अमेरिकेच्या स्थापनेपासून येथे नागरिकांच्या स्वातंत्र्याची जपणूक केली जाते. प्रत्येकाला त्याच्या इच्छेप्रमाणे उपासना करण्याचा अधिकार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले होते. मूलभूत हक्कांचे संवर्धन व्हावे यासाठी आपले प्रशासन समर्पित भावनेने काम करत असल्याचे ते म्हणाले. अमेरिकेमध्ये वंशभेदाने परिसीमा गाठलेली असताना इआन सारखे नागरिक निश्चितच आशावाद निर्माण करत आहेत अशी भावना व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shrinivas kuchibhotla kansas shooting ian grillot donald trump
First published on: 26-03-2017 at 15:53 IST