Shubhanshu Shukla Message from space Axiom Mission 4 : भारताच्या वायूदलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर बुधवारी (२५ जून) आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे रवाना झाले. नासा, स्पेसएक्स व Axiom Space च्या संयुक्त अ‍ॅक्सिऑम-४ मोहीमेअंतर्गत हे अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाऊन काही प्रयोग करणार आहेत. भारताच्या राकेश शर्मा यांच्यानंतर तब्बल ४१ वर्षांनी शुभांशू शुक्ला यांनी अवकाशात झेप घेतली आहे. “माझ्या देशबंधूंनो, ४१ वर्षांनी आपण (भारत) अवकाशात पुन्हा दाखल झालो आहोत. हा प्रवास खूपच छान झाला”, असा संदेश शुक्ला यांनी यशस्वी उड्डाणानंतर पाठवला होता. आता त्यांचं यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडलं असून अंतराळातून त्यांनी व त्यांच्या सहकारी अंतराळवीरांनी मिळून एक व्हिडीओ संदेश पाठवला आहे.

शुभांशू शुक्ला यांनी त्यांच्या व्हिडीओ संदेशात म्हटलं आहे की “अंतराळातून माझा सर्वांना नमस्कार. या प्रवासाचं वर्णन करता येणार नाही. आम्हाला हळूहळू शून्य गुरुत्वाकर्षणाची (झिरो ग्रॅव्हिटी) सवय होत आहे. मी या स्थितीची सवय करून घेतोय. एखादं बाळ चालायला शिकतं तसंच मी ही शिकतोय. इथे कसं वावरायचं, स्वतःला कसं सांभाळायचं हे शिकतोय. मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतोय. हे सगळं खूप गंमतीदार आहे. हा प्रवाश खूप रोमांचंक आहे”.

शुभांशू शुक्ला नेमकं काय म्हणाले?

शुभांशू शुक्ला म्हणाले, “अंतराळात आतापर्यंत आम्ही जे जे काही पाहिलंय ते खूप रोमांचित करणारं होतं, मी ते कधीच विसरू शकणार नाही. या प्रवासात खूप जणांचं योगदान आहे. या प्रवासातून आम्हाला खूप काही शिकायला मिळत आहे. आता कधी एकदा अंतराळ स्थानकात पोहोचतोय त्याची आम्हाला प्रतीक्षा आहे. आम्ही सर्वजण खूप उत्सूक आहोत”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधीच्या संदेशात शुभांशू शुक्ला म्हणाले होते की “या प्रवासात सर्व भारतीय तुमच्या बरोबर आहेत. ही केवळ माझ्या एकट्याच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील प्रवासाची सुरुवात नसून, भारताच्या अवकाश कार्यक्रमाची सुरुवात आहे. या मोहिमेमुळे भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाला (ह्युमन स्पेस प्रोग्राम) एक नवीन दिशा मिळणार आहे. देशातील सर्व नागरिकांनी या प्रवासाचा भाग व्हावं अशी ही माझी इच्छा आहे.