गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे मणीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत असून त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने निलंबित पोलीस अधिकारी संजीव भट्ट यांची पत्नी श्वेता भट्ट यांना उमेदवारी दिल्याने या लढतीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. श्वेता भट्ट यांनी शुक्रवारी आपल्या समर्थकांसह येथील म. गांधीजींच्या आश्रमातून पदयात्रा सुरू केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन श्वेता भट्ट यांनी निर्वाचन अधिकारी पी. के. जडेजा यांना आपला उमेदवारी अर्ज सादर केला. नरेंद्र मोदी यांनी याच मतदारसंघातून ७५ हजारांहून अधिक मताधिक्य घेतले होते. त्यांच्या तुलनेत श्वेता भट्ट अगदीच नवख्या आहेत. या मतदारसंघात दोन तुल्यबळ उमेदवारांमध्ये स्पर्धा नाही, याची आपल्याला जाणीव आहे, असे श्वेता भट्ट यांचे म्हणणे आहे. नरेंद्र मोदी यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराविरुद्ध लढत देताना आपण जनतेपुढे सत्य मांडणार आहोत, त्यामुळे जनता आपल्यालाच पाठिंबा देईल. खोटी आश्वासने आपण देणार नाही, असे भट्ट यांनी वार्ताहरांना सांगितले.