सियाचेनमध्ये हिमकडे कोसळून त्याखाली सहा दिवस गाडले गेलेले लान्स नाइक हणमंतप्पा कोप्पड यांची मृत्यूशी झुंज अखेर गुरूवारी संपली. हणमंतप्पा या लढवय्या जवानाने गुरूवारी ११.४५ मि. दिल्लीतील आर.आर. रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन दिवसांपासून हणमंतप्पा यांचे प्राण वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील तज्ज्ञ डॉक्टरही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. पण गुरूवारी हणमंतप्पांची प्रकृती आणखी खालावली आणि पावणेबारा वाजता या वीराची प्राणज्योत मालवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हणमंतप्पा यांच्या मेंदूकडे होणारा प्राणवायूचा पुरवठा खालावला. त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांना न्यूमोनियाची लागण झाल्याचे सीटी स्कॅनमधून स्पष्ट झाले होते. त्याचप्रमाणे त्यांची विविध इंद्रिये हळूहळू निकामी होत गेली. शक्य तितके सर्व उपचार करूनही त्यांची प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर आज दुपारी हृद्यविकाराचा धक्क्याने त्यांचे निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही रुग्णालयात जाऊन हणमंतप्पांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. संपूर्ण देशभर हणमंतप्पाच्या प्रकृतीत सुधारणेसाठी प्रार्थना केली होती. पण हणमंतप्पाच्या निधानाच्या बातमीने त्यांच्या मूळगावासह संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे.

सियाचेन हिमनदी क्षेत्रात गेल्या वर्षीच्या ऑगस्टपासून ते नियुक्त होते. गेल्या डिसेंबरमध्ये तेथील १९,५०० फूट उंचावरील शिखरावर नियुक्त झालेल्या तुकडीत त्यांचाही समावेश होता. तिथे उणे ४० अंश तापमानाला आणि ताशी १०० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना जवानांना तोंड द्यावे लागते. सियाचेन ग्लेशियरमध्ये ३ फेब्रुवारीला हिमस्खलनामुळे १९ मद्रास बटालियनचे दहा जवान ढिगाऱ्याखाली सापडले होते. हिमस्खलन झालेल्या ठिकाणी तब्बल २५ फूट बर्फ कापून काढल्यानंतर हणमंतप्पा कोप्पड यांना जिवंत बाहेर काढण्यात आले होते.

हणमंतप्पा हे नेहमीच जोखमीच्या मोहिमांसाठी उत्सुक असत. १३ वर्षांच्या लष्करी सेवेत अत्यंत धोकादायक आणि आव्हानात्मक भागांत त्यांनी जिद्दीने सेवा बजावली आहे. ‘‘३३ वर्षांचा हा जवान उच्च ध्येयाने भारावलेला आणि उत्तम शरीर कमावण्यावर भर देणारा आहे,’’ असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. काश्मिरात दहशतवाद्यांविरोधी मोहिमांत ते पाच वर्षे आणि ईशान्य भारतातही दोन वर्षे त्यांनी अतिरेक्यांविरोधात झुंज दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siachen braveheart lance naik hanamanthappa koppad dead
First published on: 11-02-2016 at 13:05 IST