एपी, बीजिंग : चीनमध्ये सोमवारी दोन करोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, अनधिकृत वृत्तानुसार चीनमध्ये करोना महासाथीचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत आहेत. करोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाल्याचे अनधिकृतरित्या सांगण्यात येत आहे. सोमवारी झालेले दोन्ही मृत्यू बीजिंगमध्ये झाले आहेत. चीनमध्ये अवलंबण्यात येत असलेले ‘शून्य कोविड’ धोरण (झिरो कोविड) शिथील केल्यानंतर पहिल्या आठवडय़ात या दोन मृत्यूंची नोंद झाली.

हे धोरण शिथील झाल्यानंतर करोनाच्या प्रादुर्भावात वाढ अपेक्षित होतीच. मात्र, मृत रुग्णांचे नातलग व अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत मोठी वाढ होत असल्यास दुजोरा दिला. सरकारकडून कारवाईच्या भीतीने अनेकांनी आपले नाव गुप्त राखण्याच्या अटीवर ही माहिती दिली. चीनमध्ये ४ डिसेंबरपासून करोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली नव्हती. या मृत्यूंमुळे, राष्ट्रीय आरोग्य आयोगाने गेल्या तीन वर्षांत चीनमध्ये कोविड-१९ मुळे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या पाच हजार २३७ वर गेली आहे. चीनमध्ये आतापर्यंत एकूण तीन लाख ८० हजार ४५३ करोना रुग्णसंख्या नोंदवली गेली.

Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
ससूनमध्ये नेमकं काय घडलं? उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू नव्हे तर दुसरेच कारण

ही संख्या इतर प्रमुख करोनाबाधित देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. परंतु, ही माहिती नोंदवण्याची पद्धत व आकडेवारीच्या विश्वासार्हतेविषयी जागतिक स्तरावर शंका उपस्थित करण्यात येत आहे. चीनचे आरोग्य अधिकारी केवळ थेट करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची करोना मृत्यू म्हणून गणना करतात. मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या रुग्णांना करोना  झाल्यास त्यांच्या मृत्यूची जोखीम वाढते. बहुसंख्य देशांतील करोनाविषयी मार्गदर्शक तत्त्वांनुसार या रुग्णांचाही समावेश करोना मृत्यूंमध्ये केला जातो.

चीनमध्ये अपुऱ्या माहिती व आकडेवारीमुळे करोनाच्या उद्रेकाची दिशा समजणे अधिक कठीण झाले आहे. तथापि, आर्थिक व्यवहारांतील मोठी घसरण व विषाणू प्रादुर्भावाचे अनधिकृत पुरावे मोठय़ा लाटेची चिन्हे दर्शवत आहेत. आरोग्यतज्ञांनी येत्या एक-दोन महिन्यांत या महासाथीची मोठी लाट येण्याची भीती व्यक्त केली. त्यामुळे विशेषत: ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

नववर्षांच्या गर्दीची चिंता, अपुऱ्या आरोग्य सुविधा

जानेवारीत चीनमध्ये नवीन चांद्र वर्षांच्या प्रारंभानिमित्त प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. या काळात स्थलांतरित कामगार आपापल्या गावी परततील. या काळात उसळलेल्या गर्दीत करोना प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर वाढण्याचा धोका आहे. तसेच लहान शहरे व ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांवर ताण येईल. या सुविधा अपुऱ्या पडण्याची चिंता प्रशासनास सतावत आहे. शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात रुग्णालय संख्या वाढवली आहे. मात्र वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवेवर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फक्त आजारी कर्मचाऱ्यांचा अपवाद केला गेला आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी गंभीर आजारी असल्याशिवाय रुग्णालयात दाखल न होण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे.

चीनमधील उत्परिवर्तनाची अमेरिकेस चिंता

वॉशिंग्टन : अनेक देशांमध्ये करोना महासाथीवर नियंत्रण मिळाले आहे. मात्र, जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने ‘कोविड-१९’ विषाणूच्या नवीन उत्परिवर्तनाची भीती अमेरिकेने व्यक्त केली आहे. चीनमध्ये सोमवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर झाल्यानंतर अमेरिकेने ही चिंता व्यक्त केली. या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सांगितले, की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जगभरात कुठेही आजार-विकारामुळे कुणीही बळी पडता कामा नये, अशी स्थिती आपल्याला निर्माण करायची आहे. कोविडचा विषाणू मात्र अजूनही पसरत असूनही त्यात उत्परिवर्तनाची अद्याप क्षमता आहे. त्यामुळे त्याचा अद्याप जगभरातील मानवजातीला मोठा धोका आहे. या विषाणूने आतापर्यंत केलेले उत्परिवर्तन पाहता आम्ही जगभरातील देशांना करोना प्रतिबंधासाठी निश्चितपणे मदतीस तत्पर आहोत. चीनमध्येही या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव तातडीने थांबवणे सर्वासाठी हितकारक आहे. चीनमधील करोना रुग्णांची संख्या, मृत्यूबद्दलची पारदर्श माहिती मिळत नसल्याबद्दल अमेरिकेस चिंता वाटते. चीनमध्ये या पातळीवरील स्थिती समाधानकारक असणे जगातील इतर देशांसाठी हितकारक ठरणार आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची भीती

जगभरातील आरोग्य तज्ञ व आरोग्याधिकाऱ्यांची चीनमधील करोनाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष आहे. येथील करोनाचा चिंताजनक वाढता प्रादुर्भाव पाहता एक अब्ज चार कोटी लोकसंख्या असलेल्या देशात मोठा उद्रेक होऊन २०२३ पर्यंत या देशात दहा लाखांहून अधिक रुग्णांच्या मृत्यूची शक्यता असल्याची भीती हे तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. कारण एवढय़ा अवाढव्य लोकसंख्येच्या या देशात नागरिकांचे लसीकरण अत्यंत अपुरे झाले आहे. या महासाथीची लाट आल्यास तिला तोंड देण्यास आरोग्यसुविधा-साधनांचा मोठा तुटवडा या देशास भासू शकतो. याचा जागतिक अर्थव्यवस्थेला नेमका कसा फटका बसेल, याचा कयास लावण्याचा अटोकाट प्रयत्न अमेरिका व युरोपातील अधिकारी करत आहेत. कारण चीनमधील करोनाच्या उद्रेकामुळे ‘कॉर्पोरेट’ स्तरावरील पुरवठा साखळय़ांना मोठी बाधा येऊ शकते. उत्परिवर्तन झालेला नवा विषाणू नेमका कोणता धोका निर्माण करेल याचा अंदाज बांधून संभाव्य संकट कमी करण्याच्या दृष्टीने संबंधितांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी बुधवारी स्पष्ट केले की, आम्ही चीनला स्वीकारार्ह वाटेल, अशी मदत करण्यास तयार आहोत. क्षी जिनपिंग यांच्या चीन सरकारच्या पोलादी धोरणांमुळे त्यांना मदत कशी मदत करणार याविषयी जगातील देशांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. चीनच्या लसीकरणाचा मुद्दा जिनपिंग यांनी राष्ट्रीयत्वाशी जोडल्याने त्यांना इतर देशांनी लसपुरवठा करणे जिनपिंग यांच्यासाठी कमीपणाचे ठरणार असल्याने अडचण निर्माण झाली आहे.